जाणून घ्या बर्फाने शेक घेण्याची योग्य पद्धत, चूकीच्या पद्धतीने घेतल्यास होतील अतिगंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:38 PM2021-09-09T17:38:04+5:302021-09-09T17:39:24+5:30
बर्फ जखम, वेदना, सूज आणि दातदुखी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. मात्र बर्फाने शेकताना योग्य ती काळजी न घेतल्यास अपायही होऊ शकतो.
बर्फाचे नाव ऐकून आपल्या डोळ्यांसमोर आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, आईस कँडी अशी चित्रे येतात, पण बर्फ एवढेच काम करत नाही. खाण्यापिण्याच्या वापराव्यतिरिक्त बर्फाचे आणखी बरेच फायदे आहेत. बर्फ जखम, वेदना, सूज आणि दातदुखी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. आईस पॅकचा उपयोग सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कारण ही पद्धत तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त आहे. बर्फ अगदी सहजपणे उपलब्धही होतो. मात्र बर्फाने शेकताना योग्य ती काळजी न घेतल्यास अपायही होऊ शकतो. डॉ. सीमा यादव यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला बर्फाचा शेक घेण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
बर्फाने शेकण्याचे फायदे
सूज कमी करते बर्फ
जर मानेत किंवा स्नायूंमध्ये सूज असेल तर त्या भागावर आईस पॅक लावा. हा उपाय रक्तवाहिन्या अरुंद करतो, ज्यामुळे शरीराची सूज कमी होते. कोणतीही दुखापत झाल्यास पहिल्या ७२ तासात सूज कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस. शीत तापमानामुळे नसांवर सुन्न प्रभाव पडतो जे जळजळ कमी होण्यास महत्वाची भूमिका बजावते.
मूळव्याध उपचारात मदत करते
मूळव्याध असलेले लोक बर्फाचा वापर करून गुद्द्वारात वेदना आणि अस्वस्थता कमी करू शकतात. आईस पॅक जळजळ कमी करण्यास मदत करू शकतो, परंतु ते थेट लावणे चूकीचे आहे.
टॅन आणि सनबर्न दूर करते
बर्फाचे तुकडे त्वचेला हायड्रेट देखील करतात. याचे कारण असे की बर्फात पाणी असते, जे त्वचेवर लावल्याने वेदना आणि जळजळ कमी होते.
दाताच्या वेदना कमी करते
बर्फ दातदुखीपासून आराम देऊ शकतो. संवेदनशील भागावर आईस क्यूब लावल्याने काही काळ मज्जातंतू आणि हिरड्यांना निष्क्रिय करतो आणि आराम देतो.
डार्क सर्कल्स कमी करते
बर्फाच्या सहाय्याने डार्क सर्कल्स कमी करण्यासह जळजळवरही प्रभावीपणे उपचार होऊ शकतात. हे रक्तवाहिन्या अरुंद करते, त्वचेला घट्ट ठेवते. त्यामुळे काळेपणा कमी होतो. तसेच त्वचामॉइश्चराईज होते.
वेदनांपासून आराम
इंजेक्शनमुळे स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास बाधित भागावर आईस पॅक लावल्यास वेदना कमी होतात. हे सूज कमी करण्यासह बाधित भागात ब्लड सर्क्युलेशन सुधारून वेदनांचा सामना करण्यास मदत करते.
बर्फ लावण्याची योग्य पद्धत
आरोग्यविषयक समस्यांना दूर करण्यासाठी बर्फाचा वापर करण्याच्या पद्धतीला कोल्ड थेरेपी किंवा क्रायो थेरेपी असे म्हणतात. प्रामुख्याने मुका मार किंवा सूज यांसारख्या समस्यांमध्ये बर्फाचा वापर केला जातो .कोल्ड थेरपी मध्ये नसांच्या हलचाली काही प्रमाणात मंदावल्या जाऊन वेदना कमी होण्यास मदत मिळते.
बर्फ कपड्याशिवाय त्वचेवर लावू नये यामुळे आईस बर्न होऊ शकते. बर्फ कपड्यामध्ये गुंडाळून मगच वेदनेच्या जागी शेकावा अथवा लावावा. बर्फाचा मसाज करताना खूप जास्त वेळही त्वचेवर फिरवू नये.
बर्फाचा वापर हा नैसर्गिक रित्या एखादी दुखापत भरून येण्यासाठी केला जातो. बर्फाचा मसाज करण्यासाठी वापरला जाणारा बर्फ साध्या पाण्यात बनवण्या ऐवजी तुम्ही कोरफडीचा गर, काकडीचा रस, चहा किंवा कॉफीचे पाणी, ग्रीन टी इत्यादी वापरूनही बनवू शकता.
इंजेक्शन घेतल्यानंतर होणार्या वेदनांसाठी, एक आईस क्यूब घ्या आणि आपल्या तळहातावर चोळा. हा हात दुखातप होत असलेल्या जागी हळूवार ठेवा. स्नायूंच्या वेदनांसाठी प्रभावित भागावर आईस क्यूब चोळा. चांगल्या परिणामांसाठी दिवसातून कमीतकमी तीन वेळा दोन ते तीन दिवस करा.