COVAXIN लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी 'या' औषधाचा वापर करणार भारत बायोटेक
By ravalnath.patil | Published: October 6, 2020 09:10 AM2020-10-06T09:10:27+5:302020-10-06T09:11:13+5:30
COVAXIN : भारत बायोटेक कंपनीने कोरोनावरील Covaxin लस तयार केली असून सध्या या लसीची चाचणी सुरु आहे.
हैदराबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील फार्मा कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशातील भारत बायोटेक कंपनीने सुद्धा कोरोनावरील Covaxin लस तयार केली असून सध्या या लसीची चाचणी सुरु आहे.
या Covaxin मध्ये आणखी एक औषध मिश्रित केले जाणार आहे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होईल, असे भारत बायोटेक कंपनीने म्हटले आहे. यासाठी Covaxinमध्ये Alhydroxiquim-II अॅड करणार आहे. या लसीमध्ये Alhydroxiquim-II एक सहायक म्हणून काम करेल आणि रोग प्रतिकारशक्ती आणखी वाढवेल, असे कंपनीने म्हटले आहे.
हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने कोरोनावरीव लस लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीला लस तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे, ही कंपनी सध्या Covaxin ची मानवी चाचणी दुसऱ्या टप्प्यात सुरु आहे.
अमेरिकेतील कॅनससमधील लस निर्माती कंपनी वायरोव्हॅक्स एलएलसी ही Alhydroxiquim-II तयार करते. या कंपनीबरोबर करार झाल्यानंतर भारत बायोटेक कंपनी हे औषध वापरणार आहे.
भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्ण इला यांनी सांगितले की, अशा सहाय्यक तत्त्वांची गरज असते की जे लस अँटिजनच्या प्रति अधिक अँटिबॉडी रिस्पॉन्स देतील. त्यामुळे रोगजनकांपासून दीर्घकालीन संरक्षण उपलब्ध होईल. याशिवाय, वायरोव्हॅक्सशी आमची भागीदारी भारत बायोटेकसाठी सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याच्या आमच्या समर्पणाचा परिणाम आहे, जेणेकरून दीर्घावधीपर्यंत रोग प्रतिकारशक्ती मिळू शकेल, असेही कृष्ण इला यांनी म्हटले आहे.