तुम्ही सुद्धा झोपेत दचकता का? जाणून घ्या कारणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:05 AM2019-12-21T10:05:00+5:302019-12-21T10:28:21+5:30
सर्वसाधारणपणे आपण झोपल्यानंतर काहीवेळा वेगवेगळे त्रास होत असतात.
सर्वसाधारणपणे आपण झोपल्यानंतर काहीवेळा वेगवेगळे त्रास होत असतात. तसंच दिवसभरात आलेला थकवा काढण्यसाठी ७-८ तास झोप घेणं आवश्यक असतं. पण जर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोपच येत नसेल तर दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अनेकदा काही व्यक्ती झोपेत असताना त्यांना वाईट स्वप्न पडतात, कधी दचकायला होतं. तसंच काहीजण नकळतपणे झोपेत बोलत असतात. तर काहींना झोप लागल्यानंतर गरगरल्यासारखं किंवा गोल फिरल्यासारखं होत असतं. या सगळ्यात झोप मात्र पूर्ण होत नाही. झोप न झाल्यामुळे अस्वस्थता वाढते. त्यामुळे संपूर्ण दिवस खराब सुध्दा जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया झोपेत असं का होतं.
झोपेत असताना शरीराची जी स्थिती असते त्याला हायपनिक जर्क असं म्हणतात. झोपायच्या आणि उठायच्या मधल्या वेळेतली ही स्थिती आहे. एखादी व्यक्ती ही पूर्णतः झोपेलेली पण नसते किंवा जागी सुध्दा नसते. त्यावेळी जर झोपेत काही हालचाली झाल्यास श्वास घेण्याची क्रिया ही संथ गतीने चालते.
हायपनिक हा कोणताही आजार नाही. रिसर्चनुसार जर तुम्ही झोपेत दचकून जागे होत असाल तर ही सामान्य बाब आहे. सर्वसाधारणपणे ६० ते ७० टक्के लोकांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार झोप लागल्यानंतर काहीवेळानंतर असा त्रास होतो. झोपल्यानंतर स्वप्न पडणे किंवा दचकणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. पण वारंवार असे होत असल्यास आजार सुध्दा असू शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.
गाठ झोपेत असताना दचकण्यामागे अनेक कारणं आहेत. दिवसभरातील ताण-तणाव, चिंता तसंच थकवा यांमुळे अशी समस्या उद्भवते. तसंच शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आर्यनची कमतरता असल्यास झोपेसंबंधी आजार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे कॅफिनचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला झोपेत असताना येणाऱ्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी केल्याने तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवू शकता.
दररोज ७ ते ८ तास झोप घ्या.
रोज उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेचे वेळापत्रक तयार करा.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
झोपण्याच्या आधी सोडा, चहा, कॉफी यांसारखी पेय घेऊ नका.
ताण-तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा.