आयुष्यात आजवर मी एकही सूर्योदय चुकवला नाही; ५५ वर्षांचा अक्की सांगतोय फिटनेसचे सिक्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:16 PM2023-08-25T12:16:15+5:302023-08-25T12:29:02+5:30
२४ तासातून १ तास स्वतःच्या फिटनेससाठी काढत नसाल तर आजारांना आमंत्रण देत आहात; सांगत आहे अक्षय कुमार
बी टाऊनवाले अर्थात बॉलिवूडचे कलाकार स्क्रीनवर कमी दिसले तरी पार्ट्यांमध्ये नक्की दिसतात. मात्र काही कलाकारांनी स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवले आहे. अक्षय कुमार अर्थात आपला लाडका अक्कीसुद्धा तुम्हाला क्वचितच पार्टीमध्ये दिसेल. तो सांगतो, 'पार्ट्या वाईट असतात असे मी म्हणणार नाही, पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो हे नक्की! मला जागरणाची सवय नाही, मी रात्री ९.३० ला झोपतो, पहाटे ४ला उठतो. आजवर मी एकही दिवस सूर्योदय पाहणं चुकवले नाही. दिवसाच्या सुरुवातीला योगाभ्यास, झुंबा, सायकलिंग, जिम असे विविध पर्याय निवडल्याने दिवसाची सुरुवात मस्त होते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो.''
''माझ्या मते, दिवसभरातील २४ तासांपैकी १ तास तरी प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे. फिटनेसकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तो उपभोगायला चांगलं आरोग्यही पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आधी तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. मी स्वतः हा नियम कटाक्षाने पाळतो.''
म्हणूनच की काय, वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीही अक्षय कुमार तरुण दिसतो. बॉलिवूडमधल्या नवनवीन नायिकांचा हिरो म्हणूनही शोभून दिसतो. तो व्यसनांपासूनही दूर राहतो, आहारात पथ्य पाणी सांभाळतो आणि विशेष म्हणजे रोजच्या व्यायामाला महत्त्व देतो.
या साध्या सोप्या गोष्टी आपल्यालाही फॉलो करता येण्यासारख्या आहेत. स्वतःवर घेतलेली मेहनत कायमच उपयोगी पडणारी आहे. यालाच सेल्फ इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. यासाठी उद्यापासून, सोमवारपासून, एक तारखेपासून व्यायाम सुरू करू असे म्हणत थांबू नका, कारण चांगल्या कामासाठी उद्या कधीच उगवत नसतो. शुभस्य शीघ्रम म्हणा आणि अक्षयचा आदर्श ठेवून तंदुरुस्त जीवन जगा.