डेंग्यु डासांना संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केले मादी डास, करतील डेंग्यु डासांचा संपूर्ण नायनाट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:12 PM2022-07-06T16:12:40+5:302022-07-06T16:31:29+5:30
शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' (विशेष डास) तयार केला आहे जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत. ज्या अळ्यांपासून जन्माला येतात, पण त्यांना त्यांचा विषाणू नसतो.
पावसाळा येताच डासांपासून पसरणारे डेंग्यू-चिकुनगुनिया असे आजार पसरू लागतात. हे दोन्ही आजार जीवघेणे आहेत. वेळीच उपचार झाले नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वांना डेंग्यूची भीती वाटू लागते. मात्र, आता लवकरच लोकांना धोकादायक डेंग्यू आणि चिकनगुनियापासून दिलासा मिळणार आहे. खरं तर शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' (विशेष डास) तयार केला आहे जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत. ज्या अळ्यांपासून जन्माला येतात, पण त्यांना त्यांचा विषाणू नसतो.
ICMR-VCRC चे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, वैज्ञानिकांनी एक विशेष प्रकारचा डास विकसित केला आहे जो हळूहळू डेंग्यू आणि चिकनगुनियाचा नायनाट करेल. ते म्हणाले, 'आम्ही अशा मादी डासांना सोडू जे नर डासांच्या संपर्कात येतील आणि अशा अळ्या तयार करू, ज्यात हे विषाणू नसतील. आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत आणि ती कधीही सोडू शकतात.
डेंग्यूशी लढण्यासाठी औषध नाही
ICMR-VCRC च्या संशोधकांनी एडिस ऍप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी DNDI (Drugs for Neglected Diseases Initiative-(DNDI) इंडिया फाउंडेशन) सोबत करार केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही.
डेंग्यूची लक्षणे
भारतात हा रोग पावसाळ्यात झपाट्याने पसरतो. यामध्ये ताप, अस्वस्थता, उलट्या आणि शरीरात तीव्र वेदना सुरू होतात. रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. कधीकधी रुग्णामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो. अशा स्थितीत अनेक अवयव काम करणे बंद करतात. शेवटी रुग्णाचाही मृत्यू होतो.
उत्तर भारतात डेंग्यूचा कहर
उत्तर भारतात डेंग्यूचे प्रमाण जास्त आहे. देशाच्या राजधानीत या वर्षात आतापर्यंत डेंग्यूचे 150 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत जानेवारीमध्ये 23, फेब्रुवारीमध्ये 16, मार्चमध्ये 22, एप्रिलमध्ये 20 आणि मेमध्ये 30 डेंग्यूचे रुग्ण आढळले. तर 11 जूनपर्यंत 15 प्रकरणे नोंदवली गेली.