तुम्ही वापरत असलेल्या जिऱ्यात झाडूचा भुसा तर नाही? कशी ओळखाल भेसळ? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 11:33 AM2022-02-03T11:33:55+5:302022-02-03T12:35:02+5:30
आपल्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं जीरं हे देखील काहीवेळा भेसळयुक्त असु शकतं. यासाठी बाजारातून जीरं विकत घेताना तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल.
सध्या आपण अशा वातावरणात जगत आहोत जिथे अनेकदा खाद्यपदार्थात आपल्याला भेसळ पाहायला मिळते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं जीरं हे देखील काहीवेळा भेसळयुक्त असु शकतं. यासाठी बाजारातून जीरं विकत घेताना तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल.
जीरं हा केवळ स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसाला नव्हे तर जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहे. वजन कमी करण्यात जिऱ्याचा उपयोग होतो. सकाळी काहीही खाण्यापुर्वी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन झटपट कमी होते. नुकतंच दिल्ली पोलीसांनी भेसळयुक्त जिऱ्याचा माल जप्त केला. भेसळयुक्त जिरं बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये मारण्यात आलेल्या छाप्यात २० हजार किलोचा नकली माल आणि ८ हजार किलोचा कच्चा माल जप्त केला आहे. यामागे युपीमधील शहांजपूर येथील जलालबादमध्ये राहणारी व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले आहे.
कसं बनतं भेसळयुक्त जिरं?
- भेसळयुक्त जिरं बनवण्यासाठी झाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गवताचा वापर केला जातो.
- त्याशिवाय यात लहान खडे मिसळले जातात.
- सोबतच यात गुळाचा पाकही वापरला जातो.
तुमच्या माहितीसाठी, झाडू बनवण्यासाठी जे जंगली गवत वापरलं जायचं ते उत्तरप्रदेशमध्ये पाच रुपये प्रति किलोने मिळतं. ही नदीच्या किनारी उगवते. या गवताला जी छोटी पान असतात ती जिऱ्यासारखीचं दिसतात.
भेसळयुक्त जिरं बनवण्याची प्रक्रिया काय?
भेसळयुक्त जिरं बनवण्यासाठी या विशिष्ट गवताच्या पानांना गुळाच्या पाकात भिजवलं जायचं. त्यामुळे याचा रंग अस्सल जिऱ्यासारखा दिसायचा. त्यानंतर या पानांना दगडापासून बनवल्या जाणाऱ्या पावडरमध्ये मिसळं जातं असे. त्यानंतर या मिश्रणाला लोखंडाच्या मोठ्या चाळणीने चाळलं जायचं अन् यात स्लरी पावडर(एका प्रकारची अॅसिडिक पावडर) मिसळली जायची जेणेकरुन या भेसळयुक्त जिऱ्याचा रंग अस्सल जिऱ्यासारखा दिसावा.
२० रुपयात मिळायचं भेसळयुक्त जिरं
बाजारात अस्सल जिऱ्याचा भाव ३०० रुपये प्रति किलो आहे मात्र हे भेसळयुक्त जिरं फक्त २० रुपये प्रति किलोला विकत मिळतं.
आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे भेसळयुक्त जिरं
- भेसळयुक्त जिऱ्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकवूत होते.
- तसेच यामुळे तुम्हाला त्वचा आणि किडनी स्टोनचाही त्रास उद्भवू शकतो.
कसं ओळखाल भेसळयुक्त जिरं?
भेसळयुक्त जिरं ओळखणं कठीण नाही. त्यासाठी तुम्हाला एक वाटी पाणी घ्याव लागेल अन् त्यात जिरं मिसळावं लागेल. जर जिऱ्याचे दाणे तुटले व त्याचा रंग निघाला तर समजून जा की हे जिरं भेसळयुक्त आहे. अस्सल जिरं पाण्यात आपला रंग बदलत नाही ना तुटतं. तसंच वासावरुनही तुम्हाला अस्सल आणि भेसळयुक्त जिऱ्यामधील फरक कळु शकतो. अस्सल जिऱ्याला वास असतो तर भेसळयुक्त जिऱ्याला वास नसतो.