'नवजात बालकाला कावीळ झाली तर...’; १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:29 AM2023-10-19T10:29:13+5:302023-10-19T10:29:45+5:30
काही वेळा कावीळ आपोआप होते कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेक वेळा बाळ जन्माला आले की, त्याला कावीळ झाल्याचे आढळून येते. बहुतांश नवजात शिशूंमध्ये कावीळ आढळून येण्याची सर्वसामान्य समस्या असली तरी त्याचे कारण शोधून काढून त्यावर उपाय करणे गरजेचे असते. तसेच १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण असते. मात्र काही वेळा ही कावीळ आपोआप कमी होते.
मात्र काही वेळा जर हे प्रमाण अधिक असेल तर त्याला मात्र योग्य उपचारांची गरज लागते. बालरोग तज्ज्ञ रक्ताच्या चाचणीच्या आधारे या काविळीचे निदान करून त्यांना गरज असल्यास योग्य ती उपचार पद्धती सुचवत असतात.
लक्षणे काय?
बाळाची त्वचा पिवळी होते.
लघवी गडद पिवळी होते.
शौचास पांढरे होते.
काय काळजी घ्याल?
बाळाची त्वचा पिवळी पडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
घरगुती उपचार करू नये
नवजात बालकाला कावीळ होण्याचे कारण काय?
अनुवंशिकता, दुर्मीळ आजार
मुदतपूर्व प्रसूती
आई आणि बाळाचा रक्तगट भिन्न असल्यास सुद्धा कावीळ होते
फिजिऑलॉजीकल जाँडीस जन्मानंतर २४ तासात आणि आपोआप बरा होतो
स्तनपानाशी निगडित कावीळ
‘ग्लुकोज ६ फॉस्फेट डिहायड्रोजनेझ’ या एन्झाइमची कमतरता
यकृताचे आजार
या आजराचे निदान होणे गरजेचे असते. कावीळ कोणत्या प्रकारची आहे हे पाहून उपचार पद्धती निश्चित केले जातात. यासाठी अनेकवेळा रक्ताच्या चाचण्या करून बिलिरुबिनचे प्रमाण रक्ततील वाढले आहे का ? हे पहिले जाते. जर तसे आढळून आल्यास त्यासाठी ‘फोटो थेरपी’चे उपचार सुचविले जातात. काही वेळा स्तनपान पुरेसे नसल्याने सुद्धा कावीळ होते. तर काही वेळा स्तनपानातून सुद्धा कावीळ होते. या अशावेळी निदान करून योग्य तो निर्णय घेतला जातो. काही बाळाची कावीळ आपोआप बरी होते. तर काहींना यकृताचे काही आजार असतील तर व्यवस्थित उपचारांची गरज लागते.
- डॉ विजय येवले,
माजी अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स