अर्थिक टेन्शन्स जास्त असतील, तर हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो तब्बल १३ पटींनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:21 PM2017-11-11T15:21:20+5:302017-11-11T15:22:08+5:30
आर्थिक ताणापासून सुटका करण्यासाठी प्रत्येकानं स्वत:ला ठेवावं तयार..
- मयूर पठाडे
समजा तुमच्या छातीत थोडं दुखायला लागलं किंवा तुम्हाला खरोखरच हृदयविकाराचा त्रास आहे, डॉक्टर तुम्हला पहिल्यांदा काय सांगतात, किंवा विचारतात?... तुम्हाला कसलं टेन्शन आहे का, तुम्ही फार टेन्शन घेता का? धुम्रपान करता का? तुमची लाइफस्टाइल कशी आहे?..
डॉक्टर जे काही प्रश्न विचारतात, ते बरोबरच आहेत, पण बहुतांश कोणताही डॉक्टर तुम्हाला काही आर्थिक अडचण आहे का, किंवा आर्थिक टेन्शन्स आहेत का, असं कधी विचारत नाही..
पण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील संशोधकांनी यासंदर्भात नुकतंच एक विस्तृत संशोेधन केलं आहे. हे संशोधन सांगतं, हृदयविकाराच्या संदर्भात ज्या इतर सर्वसामान्य बाबी आपण तपसातो आणि डॉक्टरही ज्यावर भर देतात, त्यापेक्षाही अशा पेशंट्सची आर्थिक हिस्ट्री.. अर्थातच आर्थिक कारणांमुळे त्याला काही ताण आहेत का, हे तपासलं पाहिजे. त्याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं आणि पेशंट्सनाही त्याबाबत सावध केलं गेलं तर हृदयविकारापासून हे रुग्ण दूर राहू शकतात.
यासंदर्भातील सर्वात महत्त्वाचं संशोधन म्हणजे ज्यांना आर्थिक ताण आहे, अशा लोकांना हार्ट अॅटॅक येण्याचा धोका तब्बल १३ पटींनी वाढतो. त्यामुळे आर्थिक ताणावर वेळीच प्रतिबंधक उपाय प्रत्येकानं योजले पाहिजेत. ज्यांना अजून हृदयविकार नाही, पण आर्थिक टेन्शन्स वाढायला लागल्यावर त्यासंदर्भातली काळजी वेळेत घेतली तर हृदयविकार आणि आणि हार्ट अॅटॅकपासून या रुग्णांची सुटका होऊ शकते. त्यासाठी आपल्याला आर्थिक ताण येणार नाही, याकडे शक्यतो प्रत्येकानं लक्ष द्यावं.
आर्थिक गोष्टी सांगून येत नाहीत, हे खरं असलं तर त्यानं काय होऊ शकतं हे माहीत असलं तर त्यापासून बचावाचे मार्गही आपण शोधू शकतो हे त्यात सर्वाधिक महत्त्वाचं.