लठ्ठ असाल किंवा अशक्त.. नैराश्य तुमचं बोट धरुन येणारच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:21 PM2017-11-13T15:21:37+5:302017-11-13T15:22:43+5:30
कुठल्याही प्रकारच्या अतिरेकापासून वाचवा स्वत:ला..
- मयूर पठाडे
कोणाला जाड व्हायचं असतं, तर कोणाला बारीक व्हायचं असतं. जाड होणं म्हणजे शब्दश: जाड आणि लठ्ठ होणं नव्हे. पण अनेक कारणांनी काही जण खूप बारीक असतात. त्यांच्यात अशक्तपणा असतो. हा अशक्तपणा त्यांच्या आयुष्यावर, लाइफस्टाइलवर आणि त्यांच्यातील क्षमतेवरही परिणाम करीत असतो. त्यामुळे त्यांना आपलं वजन वाढवण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी बºयाचदा देतात.
आणि बहुतांश जणांना तर बारीक होण्याच्या मानसिकतेनं पछाडलेलं असतं. काहीही करुन त्यांना बारीक व्हायचं असतं. थोडं कुठे दोन घास जास्त खाल्ले गेले किंवा गोड खाण्यात आलं, की लगेच त्यांचे डोळे भितीनं गरगरायला लागतात, छातीत धडधड व्हायला लागते.. आपलं वजन आता वाढलं तर नाही?..
यासंदर्भात नुकतंच एक संशोधन झालंय.. अर्थात यापूर्वी अशा प्रकारचे बरेच अभ्यास करण्यात आले असले तरी यावेळच्या अभ्यासाचं वेगळेपण म्हणजे तुम्ही लठ्ठ असाल किंवा अशक्त असाल.. तर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. म्हणजे मुळातच अशा लोकांना त्या चिंतेनं भेडसावलेलं असतं, पण शास्त्रीय दृष्ट्याही त्यामुळे तुम्हाला नैराश्य येण्याचं प्रमाण वाढू शकतं.
नुकत्याच झालेल्या या अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे महिलांच्या बाबतीत हे जास्त खरं आहे. ज्या महिला लठ्ठ किंवा अशक्त असतात, त्यांना नैराश्याच्या समस्येचा जास्त तीव्रतेनं सामना करावा लागतो..
त्यामुळे कोणीही या टोकाच्या गोष्टीपासून आपल्याला सावरावं. यातली आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे काही जण अगोदर तंदुरुस्त असतात, पण बारीक होण्याच्या हव्यासापायी आणि त्यासाठी स्वत:वर केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांमुळे ते स्वत:ला आपणहून रुग्ण बनवून घेतात. त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो आणि अर्थातच त्यानंतर विविध विकार.
त्यामुळे अशा दोन्ही प्रकारांपासून स्वत:ला वाचवा.