व्यायाम केला, तर ब्रिटिश सरकार देणार पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:38 AM2021-07-31T05:38:17+5:302021-07-31T05:39:10+5:30

exercise: तुम्हाला व्यायाम करायला आवडतं? आवडत असेल, तर प्रश्नच नाही; पण आवडत नसेल तर?.. आपलं पोट सुटलंय, वजन वाढलंय, डायबिटीस हळूच अंगात घुसलाय, आता तरी व्यायाम करायलाच पाहिजे, हे तुम्हालाही माहीत आहे,

If you exercise, the British government will pay! | व्यायाम केला, तर ब्रिटिश सरकार देणार पैसे!

व्यायाम केला, तर ब्रिटिश सरकार देणार पैसे!

Next

तुम्हाला व्यायाम करायला आवडतं? आवडत असेल, तर प्रश्नच नाही; पण आवडत नसेल तर?.. आपलं पोट सुटलंय, वजन वाढलंय, डायबिटीस हळूच अंगात घुसलाय, आता तरी व्यायाम करायलाच पाहिजे, हे तुम्हालाही माहीत आहे, तरीही नव्याचे नऊ दिवस आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, असं तुमचं होतं ना? आता कामधंदा करणार, महागाई आणि कोविडच्या या काळात असलेली नोकरी टिकवणार, पैसा कमावणार की व्यायाम करीत बसणार, हा तुमचा प्रश्नही योग्यच आहे; पण तुम्ही रोज व्यायाम केला, चांगलंचुंगलं खाल्लं, म्हणजे सटरफटर नव्हे, आरोग्यदायी, हेल्दी फूड खाल्लं, मार्केटमध्ये, मॉलमध्ये जाऊन ताजा भाजीपाला, हिरव्या पालेभाज्या खरेदी केल्या आणि त्याबद्दल कोणी तुम्हाला पैसे, इन्सेन्टिव्ह दिला, मग तरी व्यायाम करणार की नाही? 
विचारात पडलात ना? - तसं खरंच होऊ घातलंय. 
ब्रिटननं तशी स्कीमच जाहीर केलीय. जे लोक नियमित व्यायाम करतील, पौष्टिक खातील आणि हेल्दी फूड विकत घेतील, त्यांना प्राेत्साहन देण्यासाठी ब्रिटन सरकार रोख पैसे तर देणार आहेच; पण सिनेमाची मोफत तिकिटं, मोफत व्हाऊचर्स, विविध खरेदीवर सूट... अशी नागरिकांची चंगळ होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून ही योजना लागू हाेण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमध्ये लठ्ठ मुलं आणि माणसांची संख्या दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणात वाढते आहे. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार इंग्लंडमध्ये तब्बल ४१ टक्के लोकांनी मान्य केलं आहे, की हो, आमचं पोट सुटलंय आणि वजनही वाढलंय. या लोकांचं सरासरी तब्बल चार किलो वजन वाढले असल्याचा अभ्यासाचा निष्कर्ष आहे. अर्थात, हा अभ्यास आताचा, म्हणजे काेरोनाकाळात करण्यात आला आहे. मार्च २०२० नंतर हजारो लोकांना याबाबतीत प्रश्न विचारून माहिती घेण्यात आली. या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, ब्रिटनमध्ये ढेरपोट्या लोकांची समस्या नवी नाही. ती जुनीच आहे; पण कोरोनाकाळात लोक घरात बसून आणि येता-जाता काहीतरी खात राहिल्याने ही समस्या वाढली आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू नये, जाहिरातींना ती बळी पडू नयेत म्हणून जंक फूडच्या टीव्हीवरील जाहिरातींवर ब्रिटन सरकार बंदी आणणार आहे. काही दिवसांपूर्वी याच सदरात आपण हे वाचलं होतं.
सरकार याबाबत खूपच गंभीर असल्यानं त्यांनी त्यापुढचा उपाय योजताना लोकांना हेल्दी सवयी लागाव्यात यासाठीच चंगच बांधला आहे. त्यासाठी लोकांच्या खरेदीवर नजर ठेवली जाणार आहे. मॉलमधून जे लोक आरोग्यदायी अन्नपदार्थ विकत घेतील, त्यांची नोंद ठेवली जाईल, तसेच जे नागरिक मॅरेथॉन, लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेतील, खेळाशी ज्यांचा नित्य संबंध असेल, जे शाळा-कॉलेज, तसंच ऑफिसमध्ये पायी जातील, अशा नागरिकांसाठी विविध सोयी-सवलती आणि पैसे ‘बक्षीस’ म्हणून देण्याची सरकारची योजना आहे. त्याचबरोबर जंकफूड, जास्त गोड आणि खारट पदार्थांवर अधिकचा टॅक्स लावण्याचा प्रस्तावही सरकारनं ठेवला आहे.
लोकांनी तंदुरुस्त राहावं, त्यांच्या खानपानात सुधारणा व्हावी यासाठी ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (एनएचएस) या संस्थेतर्फे दूरचित्रवाहिन्यांवर आता विविध फूड शोही दाखवण्यात येणार आहेत. अर्थातच या शोमध्ये हेल्दी रेसिपी दिल्या जातील. लोकांनाही त्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. जे लोक वेगवेगळ्या आयडिया देतील, त्यांना बक्षिसंही दिली जातील.
नॅशनल क्लिनिकल डायरेक्टर फॉर डायबिटीस ॲण्ड ओबेसिटीचे प्रोफेसर जाेनाथन यांचं म्हणणं आहे, लठ्ठपणा ही नुसतीच चुकीची जीवनशैली नाही, तर अनेक आजारांना आमंत्रित करणारा तो एक मोठा विकार आहे. लठ्ठ लोकांना कोरोनाचा जास्त त्रास झाला, हे जगभरात आपण पाहिलंच; पण लठ्ठपणामुळे, मधुमेह, हृदयविकार, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि इतरही व्याधी होतात. त्यामुळं लठ्ठपणाची समस्या तातडीनं सोडवली पाहिजे.
‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’चे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. ॲलिसन टेडस्टोन यांचं म्हणणं आहे की, आपली लाइफस्टाइल कशी चुकते आहे आणि हळूहळू आपण लठ्ठपणाकडे कसे जात आहोत, हे लगेच लक्षात येत नाही, लक्षात येतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो आणि इतक्या साऱ्या समस्या घेऊन जगणं खरोखरच अवघड आहे. नुसत्या औषधांवर माणूस जगू शकत नाही.
‘डिपार्टमेंट ऑफ हेल्थ ॲण्ड सोशल केअर’ (डीएचएससी) या संस्थेच्या मते ब्रिटनमधल्या जवळपास दोनतृतीयांश (६३ टक्के) लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे. दर तीनपैकी एक मूल प्राथमिक शाळा सोडताना लठ्ठपणा सोबत घेऊनच माध्यमिक शाळेत जातं. तिथंही ते तसंच कायम राहतं. या लठ्ठपणावर मात करण्यासाठी सरकारला दरवर्षी किमान सहा बिलिअन डॉलर खर्च येतो!  

पंतप्रधानांनी सोडलं चॉकलेट खाणं!
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना गेल्या वर्षी कोरोना झाला होता. ‘माझा कोरोना चिंताजनक परिस्थितीत पोहोचला होता, याचं कारण माझं वाढलेलं वजन! मी खूपच लठ्ठ झालो होतो’, हे त्यांनी स्वत:च जाहीरपणे सांगितलं होतं. माझं वजन नियंत्रणात आणण्यासाठी मी चॉकलेट आणि रात्री उशिरा चीज खाणं सोडून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Web Title: If you exercise, the British government will pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.