पुरेशी झोप घ्याल, तर आनंदी राहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 10:28 AM2024-03-10T10:28:44+5:302024-03-10T10:29:10+5:30

वैद्यकीय अभ्यासानुसार आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश वेळ झोपेत जातो.

if you get enough sleep you will be happy | पुरेशी झोप घ्याल, तर आनंदी राहाल!

पुरेशी झोप घ्याल, तर आनंदी राहाल!

डॉ. कौस्तुभ महाजन, मेंदूविकार तज्ज्ञ, फोर्टिस रहेजा हॉस्पिटल, मुंबई

वैद्यकीय अभ्यासानुसार आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश वेळ झोपेत जातो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चांगली झोप महत्त्वाची आहे. झोपेचे महत्त्व अनेकवेळा अधोरेखित झाल्यानंतरसुद्धा अनेकजण तरुणपणीच्या काळात झोपेच्या तक्रारींना गांभीर्याने घेत नाही त्याचा परिणाम वयाची चाळीशी ओलांडली की, हळूहळू दिसायला सुरुवात होते. रात्री व्यवस्थित झोप घेतल्याने आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेकजण ताणतणावात जगत असतात. काही जण त्यावर योग आणि विविध प्रकारचे व्यायाम करून मात करतात; मात्र काही जणांना ते शक्य होत नाही, त्याचा सगळा परिणाम झोपेवर होतो. १५ मार्च जागतिक निद्रा दिन आहे. त्यानिमित्त झाेपेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. 

प्रत्येक व्यक्तीला ८ तास झोप आवश्यक असते. काही वेळा लहान मुले ९ ते १० तास झोपतात, तर काही वेळा वयोमानानुसार झोप कमी होते. वृद्धांमध्ये ५ ते ६ तास झोप पुरेशी असते. काही जण दुपारी २० ते २५ मिनिटांची ‘पॉवर नॅप’ घेतात, तेवढी पुरेशी असते. झोपेचे कालचक्र बिघडले तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण दिवसातील कामावर दिसून येतो.

वैद्यकीय शास्त्रानुसार, झोप एकसारखी नसते. रात्रीच्या वेळी झोप विविध चक्राच्या फेऱ्यांनी बनलेली असते.  जलद डोळ्यांची हालचाल होत असलेली झोप (रॅपिड आय मूव्हमेंट अर्थात आरईएम स्लीप).  यात डोळे वेगवेगळ्या दिशांनी वेगाने फिरतात आणि स्वप्ने येऊ शकतात. ही  झोप साधारणपणे झोपेच्या ९० मिनिटांत सुरू होते. तर याच्या विरोधातील म्हणजे जलद डोळ्यांची हालचाल होत नसलेली झोप (नॉन रॅपिड आय मूव्हमेंट अर्थात एनआरईएम स्लीप). यात एखादी व्यक्ती झोपी जाते आणि नंतर हलक्या झोपेतून गाढ झोपेत जाते. त्यावेळी  त्या व्यक्तीच्या मेंदूची क्रिया, श्वासोच्छ्वास आणि हृदय गती मंदावते, शरीराचे तापमान कमी होते. स्नायू शिथिल होतात आणि डोळ्यांच्या हालचाली थांबतात तेव्हा असे होते. ‘आरईएम’ नसलेली झोप शरीराच्या ऊतींची दुरुस्ती करण्यात, हाडे आणि स्नायू तयार करण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सामान्य झोपेदरम्यान, एखादी व्यक्ती चार ते पाच झोपेच्या चक्रांमधून जाते.  जी प्रत्येकी सुमारे ९० मिनिटे टिकते आणि त्यात नॉन-आरईएम स्लीप आणि आरईएम स्लीप, दोन्ही समाविष्ट असतात.

झोप पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळे  विविध समस्यांना सामोरे जावे लागते. एकाग्रता आणि सतर्कतेवर जबरदस्त परिणाम होतात, तसेच स्मरणशक्ती कमी होते.  लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या मोठ्या आजारांना निमंत्रण मिळते. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी  झोप आवश्यक आहे. संतुलित आहार घ्यावा.

झोपेचे आरोग्य कसे राखाल?

झोपेची वेळ निश्चित करा. झोपेची जागा एकच असावी. झोपेच्या एक तास आधी कोणतीही स्क्रीन पाहू नये. विनाव्यत्यय झोप मिळणे गरजेचे आहे. संध्याकाळनंतर चहा, कॉफी घेऊ नये. नियमित व्यायाम करावा.

झोप का आवश्यक आहे?

दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे निद्रानाशासारखी गंभीर समस्या उद्भवते. त्यामध्ये रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे दिवसा झोप लागते, संपूर्ण दिवस थकल्यासारखे वाटते. कामात लक्ष लागत नाही. त्यानंतर  स्लीप ॲप्निया हा एक आजार बळावू शकतो. त्याला श्वासावरोध असेही म्हणतात. यामध्ये झोपेत जिभेमागचे काही स्नायू शिथिल होतात. मोठ्याने घोरणे, श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे झोपेतून मध्येच उठणे हे प्रकार होतात.

स्लीप स्टडी म्हणजे काय?

झोपेच्या विकारांवर उपचार आहेत; मात्र ते वेळच्या वेळी घेतले गेले पाहिजे. झोपेचा अभ्यास करण्यासाठी ‘स्लीप स्टडी’ केली जाते. त्यामध्ये दोन रात्री शरीराला विशिष्ट यंत्र लावून झोप मोजली जाते. त्यावेळी तुमची झोप कशी आहे, याचे निदान करून त्यावर उपचार करता येतात. जागतिक निद्रा दिन निरोगी झोपेची जनजागृती करण्यासाठी साजरा केला जात असतो.
 

Web Title: if you get enough sleep you will be happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.