शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:09 PM2021-07-02T17:09:47+5:302021-07-02T17:20:21+5:30

काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

If you start feeling anemia in the body, be careful in time, know the symptoms ... | शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे...

शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे...

googlenewsNext

अ‍ॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमी होणं अथवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. रक्तातील लाल रक्तकणांमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला रक्तावाटे ऑक्सिजनचा पूरवठा केला जातो. रक्तावाटे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे सर्व शारीरिक क्रिया व्यसस्थित पार पाडल्या जातात. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अ‍ॅनिमिया अथवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया...

चक्कर येणे
शरीरातील रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जे अन्न खाता त्याचे रूपांतर रक्तात होते. शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर तुमच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या शारीरिक हालचालींवर होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊन चक्कर येते.

ह्रदयाची ठोके वाढणे
शरीराला रक्ताचा पूरवठा कमी होतो. ह्रदयाला रक्तपूरवठा कमी झाल्यामुळे शारीरिक क्रियांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात.

डोकेदुखी
मेंदूला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यास तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. यासाठी जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच ब्लड टेस्ट करा. 

हाडे, छाती, पोट आणि सांधेदुखी जाणवणे
शरीरातील रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. ज्यामुळे तुमच्या छातीत, पोटात वेदना होतात. त्याचप्रमाणे सांधे आणि हाडे दुखू लागतात.

धाप लागते
ह्रदयाला रक्तपूरवठा न झाल्यास ह्रदयाचे ठोके वाढतात आणि सतत धाप लागण्याचा त्रास जाणवू लागतो.

त्वचा पांढरट आणि पिवळसर दिसू लागते
शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तकणांच्या लाल रंगामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होत असतो. मात्र शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पांढरट दिसू लागते.

हात पाय थंड पडणे
जर तुमच्या शरीरातील रक्ताचे कार्य बिघडले तर त्याचा परिणाम तुमच्या इतर शारीरिक क्रियांवर होतो. शरीराला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे हात पाय थंड पडतात.

थकवा आणि अशक्तपणा
रक्तात तुम्ही  खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक असतात. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्त कमी होते तेव्हा ते पोषक घटक न मिळाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा  येतो.

या आजारावरील उपाय
पालकचा आहारात समावेश करा
आहारात पालक, इतर हिरव्या आणि पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. तुम्ही पालकाची भाजी किंवा साग खाऊ शकता.

काळ्या मनुका आणि खजूर
या दोन्ही सुकामेव्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे दररोज एक खजूर आणि चार-पाच मनुका खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा जेवणाच्या मधल्यावेळेत हा सुकामेवा खाऊ शकता.

टॉमेटोचा आहारात समावेश करा
शरीरातील रक्ताची कमी भरुन काढण्यासाठी टॉमेटोचा भरपूर फायदा होतो. टॉमेटो तुम्ही दरररोज खाल्ला पाहिजे. तुम्ही सॅलड म्हणून सुप करून किंवा भाजी बनवून टॉमेटो खाऊ शकता.

बीटाचे सेवन
रोज बीट खाणे शरीरातील रक्ताचा स्तर वाढवण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. बीट आणि डाळिंबाचा ज्युस एकत्र करून पिण्याचेही बरेच फायदे आहेत. दोघांचाही ज्युस बनवून प्यायल्याने शरीरात रक्ताची मात्रा वाढवता येते.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: If you start feeling anemia in the body, be careful in time, know the symptoms ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.