काकडी घ्याल तर, साल पाहूनच; अजिबात कडू निघणार नाही, वापरा या टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 04:11 PM2023-05-23T16:11:19+5:302023-05-23T16:16:04+5:30
वरून हिरवीगार दिसणारी काकडी अनेकदा आतून कडू निघते आणि फेकावी लागते, त्यात पैसे वाया जाऊ नयेत म्हणून खास टिप्स लक्षात ठेवा.
ऋतुमानानुसार खाल्लेल्या फळातून शरीराला आवश्यक पोषण मूल्य मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्यात कलिंगड आणि काकडीवर आपण जास्त भर देतो. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही उपाय स्वस्त आणि मस्त आहेत. अलीकडे या दोन्ही गोष्टी बारमाही मिळत असल्या तरी उन्हाळ्यात त्यांचे महत्त्व अधिक असते. पण त्यांची पारख महत्त्वाची असते. कलिंगडाची निवड कशी करावी, याची माहिती देणारा लेख आपण याआधी वाचला आहे, आज काकडीची निवड कशी करावी ते जाणून घेऊया.
काकडी स्वस्त मिळत असली, तरी अनेकदा काकडीचा वाटा उचलल्यावर दोन चार काकड्या कडवट निघत असल्याचा आपल्याला अनुभव येतो. बाहेरून छान टप्पोरी, डागविरहित, हिरवी काकडी आतून खराब निघू शकेल याची कल्पनाही करवत नाही. काही जण तर तोंडाची चव बिघडेल म्हणून काकडीची सुरुवातीची चकतीही खाण्यास नकार देतात. तर अनेकांच्या बाबतीत काकडीची चव बघण्यात अर्ध्याहून अधिक काकडी संपून जाते. यावर उपाय म्हणजे काकडीच्या सालीवरून तिची परीक्षा! ती कशी करायची ते जाणून घेऊया.
काकडीचे साल
काकडी घेताना तिचे साल नीट पाहणे गरजेचे आहे. जर काकडी गडद हिरवी असेल आणि त्यावर थोडासा पिवळसरपणा असेल तर ती काकडी ताजी समजावी आणि चवीला कडू निघणार नाही याची खात्री बाळगावी. कारण हिरव्या सालीच्या काकडी देशी किंवा गावठी काकडी म्हणून ओळखल्या जातात. ती काकडी शक्यतो कडू निघत नाही.
काकडी मऊ नसावी
मऊ काकड्या जास्त बियांनी भरलेल्या आणि आतून गुळगुळीत असतात. अशा परिस्थितीत काकडी खरेदी करताना ती दाबून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली आणि ताजी काकडी टणक असते आणि ती जून निघण्याची शक्यता नसते.
आकारानुसार काकडी घ्या
बाजारात अनेक आकाराच्या काकड्या उपलब्ध असतात. मात्र विकत घेताना शक्यतो उंचीने छोट्या काकड्यांची निवड करावी. फार लांबसडक काकड्या घेऊ नये. गावठी काकडी एकवेळ मोठी असली तरी चालेल, पण पांढऱ्या फटक लांबसडक काकड्या अजिबात विकत घेऊ नका, त्या कडवट लागू शकतात. जाड काकड्याही घेऊ नये, मध्यम आकाराच्या काकड्या सहसा कडवट निघत नाहीत.
अशी काकडी घेऊ नका
काकडी कुठेतरी कापली किंवा वाकलेली असेल तर ती खरेदी करणे टाळा. तसेच ज्या काकड्यांवर पांढऱ्या रेषा दिसतील. त्या काकड्या कडू निघण्याची शक्यता जास्त असते. तशा काकड्यांची खरेदी टाळावी.