चालाल तर वाचाल, चालण्याचे असे फायदे जे तुम्ही स्वप्नातही पाहिले नसतील...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:35 PM2021-06-11T15:35:54+5:302021-06-11T16:25:57+5:30
सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शहरामध्ये प्रदूषणाचा खूपच त्रास असतो. पण सकाळच्या या प्रहरी प्रदूषण कमी प्रमाणात असते आणि हवा स्वच्छ असते. ज्यामुळे मनाला शांतता मिळते आणि शरीराला अधिक ऊर्जाही प्राप्त होते.
ासकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शहरामध्ये प्रदूषणाचा खूपच त्रास असतो. पण सकाळच्या या प्रहरी प्रदूषण कमी प्रमाणात असते आणि हवा स्वच्छ असते. ज्यामुळे मनाला शांतता मिळते आणि शरीराला अधिक ऊर्जाही प्राप्त होते. सकाळी चालण्याचे फायदे अनेक आहेत. त्यापैकीच काही फायद्यांविषयी डॉ. आशुतोष गोयल यांनी पारस हॉस्पिटल या संकेतस्थळाला दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हृदय रोगासाठी फायदेशीर
मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी चालण्याचा सर्वात मोठा फायदा मिळतो तो हृदयाला. सकाळी नियमित चालण्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांना नेहमीच डॉक्टरही चालण्याचा सल्ला देतात. यामुळे रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो ज्यामुळे हृदयाला धोका राहात नाही.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त
रोज सकाळी चालण्याने शरीरामधील रक्तप्रवाह उत्तम राहतो आणि ज्याचा सकारात्मक प्रभाव प्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्याने ऑक्सिजनचा त्रास होत नाही आणि ऑक्सिजनमध्ये सुधारणा होते. दिवसाला अर्धा तास चालण्याने तुमची इम्यून सिस्टिम अधिक मजबूत होते आणि आजाराशी लढा देण्यास मदत करते.
मधुमेही रुग्णांकरिता वरदान
मधुमेही व्यक्तींना सर्वात पहिला सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो तो म्हणजे सकाळी चालायला जाणे. मधुमेह हा अनियंत्रित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. पण तुम्ही सकाळी चालायला गेल्यामुळे ही समस्या काही प्रमाणात तुम्ही आटोक्यात आणू शकता. केवळ सकाळी अर्धा तास चालल्याने तुमच्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
वजन कमी करण्यासाठी उत्तम
आहार नियंत्रणासह सकाळी चालण्याचा उत्तम फायदा म्हणजे वजन कमी होते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा उत्तम उपाय आहे. अनियंत्रिण खाणे आणि वाईट जीवनशैलीमुळे वजनवाढ ही सध्याची समस्या झाली आहे. शारीरिक परिश्रमाशिवाय आपल्याला खाणे पिणे हवे असते. त्यामुळे वजन वाढू लागते. पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज न चुकता तुम्ही सकाळी किमान अर्धा तास ते पाऊण तास चालयला हवे. याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होते. तज्ज्ञांनुसार आहारातील बदलाशिवायदेखील सकाळी चालण्याने वजन कमी होते. अभ्यासानुसार सकाळी चालल्याने शरीरातील फॅट कमी होतात आणि शरीरातील लचक अधिक वाढते तसंच मांसपेशींनाही मजबूती मिळते. पण याबरोबर आहारावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे.
तणावमुक्तता
घर असो वा ऑफिस सध्या सगळंच वातावरण तणावग्रस्त झालेले असते. तणावाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. पण यापासून तुम्हाला सकाळी चालण्याने अधिक फायदा मिळतो. तणानामुळे शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होत असतो. यातून बाहेर पडण्यासाठी सकाळी चालण्याने फायदा मिळतो. मॉर्निंग वॉकमुळे डोक्यापासून ते पायापर्यंत रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. तसंच सकाळची ताजी हवा तुम्हाला तणावापासून मुक्त राहण्यासाठी फायदेशीर ठरते.