कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करताय, तर जंक फुड टाळा, अभ्यासात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:25 PM2022-01-12T15:25:32+5:302022-01-12T15:31:51+5:30
पिझ्झा आणि बर्गर सारख्या फास्ट फूडच्या सेवनामुळे माणसांच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक शक्ती हीच शरीराला हानी पोहोचवत आहे.
कोरोना महासाथीमुळे (corona) कधी नव्हतं तेवढं रोगप्रतिकारक शक्तीचं (Immunity power) महत्त्व अनेकांना पटलं आहे. कोणता पदार्थ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ( good for health ) आहे, याची माहिती सातत्याने मिळवली जात असते. नियमितपणे फास्ट फूड (Fast food) खाणं हे आरोग्यासाठी योग्य नाही, हे सर्वांनाच माहीत आहे, तरीही ते खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फूडचा आहारामध्ये अधिकाधिक वापर हा अनेक आजारांसाठी निमंत्रण ठरत आहे.
सध्या फास्ट-फूड खाण्याचा ट्रेंड जगभरात वाढत आहे. मात्र फास्ट फूडचा आहारामध्ये अधिकाधिक वापर हा अनेक आजारांसाठी निमंत्रण ठरतोय. फास्ट फूडमुळे लठ्ठपणासोबतच (Obesity) आणखी काही नव्या आजारांचा धोका देखील निर्माण झाला आहे. पिझ्झा आणि बर्गर सारख्या फास्ट फूडच्या सेवनामुळे माणसांच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक शक्ती हीच शरीराला हानी पोहोचवत आहे. लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटने (Francis Crick Institute) नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार सध्या पश्चिमेकडील देशांसोबतच अशिया खंडातदेखील ऑटोइम्युन डिसिजच्या (Autoimmune disease) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा एक असा आजार आहे, की ज्यामध्ये माणसाची रोगप्रतिकारक शक्ती हीच त्याच्या शरीराला हानी पोहोचवते.
संशोधिका क्यारोला विनेसा यांनी याबाबत सांगितलं की, 'पिझ्झा आणि बर्गरसारख्या फास्ट फूडमुळे तुमच्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती ही कन्फ्युज होत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फास्ट फूडच्या सेवनामुळे तुमच्यामध्ये असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीला तुमच्या शरीरामधील चांगल्या पेशी आणि आजारी पेशी यामधील फरक ओळखणं शक्य होत नाही. त्यामुळे ऑटोइम्युन डिसिजची समस्या निर्माण होते.' त्या पुढे म्हणाल्या, 'फास्ट फूड जगभर ज्या प्रकारे पसरले आहे, ते पाहता त्यावर लगाम घालणे आता कठीण झाले आहे. यूकेमध्येही ऑटोइम्युन डिसिजच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. जवळपास 40 लाख लोक या आजाराशी झुंज देत आहेत. यापैकी बऱ्याच लोकांना इतर आजार सुद्धा आहेत. हा आजार 3 ते 9 टक्के दराने वाढत आहे. म्हणूनच लोकांनी त्यांच्या खाण्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.'
तर, शास्त्रज्ञ जेम्स ली यांनी सांगितले की, 'सध्या जगभरात ऑटोइम्यून डिसिजची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आहारामध्ये सातत्याने बर्गर, पिझ्झा यासारख्या फास्ट फूडचा समावेश केल्यामुळे अशा प्रकारचे आजार उद्धभवतात. तसेच फास्ट फूडमुळे पोटाशी संबंधित इतर आजारात देखील वाढ झाली आहे.'
संशोधकांच्या मते,ऑटोइम्यून डिसिजमुळे टाइप-1 मधुमेह, संधिवात आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारखे आजार होतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या अवयवांना आणि ऊतींना हानी पोहोचवू लागते. या आजारांचे नेमके कारण काय आहे, हे आजपर्यंत शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत, परंतु असे आजार होण्याचा धोका वाढवणारे काही घटक आहेत. फास्ट फूड हा देखील त्यापैकीच एक. संशोधनादरम्यान मानवी जनुकांच्या अभ्यासाच्या मदतीने वैज्ञानिकांनीही हे सिद्ध केले आहे.
स्वतःचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. डॉक्टरांच्या सल्लानुसार अनेकदा आहारामध्ये बदल केला जातो. आहाराबाबत पथ्यही पाळले जातात. मात्र, फास्ट फूडचे जास्त सेवन करणे हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे माहिती असतानाही अनेकजण त्याचे सेवन करतात. ही सवय बदलणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.