‘इम्युनिटी’चा झोपेशी संबंध असतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:20 PM2021-07-02T15:20:37+5:302021-07-02T15:21:38+5:30

लष्कराचे उदाहरण घ्या. आपले लष्कर हे जवानांनी बनते, त्याचप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती ही प्रामुख्याने ‘पांढऱ्या’ पेशींची बनलेली असते

Is ‘immunity’ related to sleep? Find out the opinions of experts | ‘इम्युनिटी’चा झोपेशी संबंध असतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

‘इम्युनिटी’चा झोपेशी संबंध असतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next
ठळक मुद्देलष्कराचे उदाहरण घ्या. आपले लष्कर हे जवानांनी बनते, त्याचप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती ही प्रामुख्याने ‘पांढऱ्या’ पेशींची बनलेली असते.

- डॉ. अभिजित देशपांडे 

आपल्या झोपेचा आणि या इम्युनिटीचा काय संबंध आहे? झोप कमी घेतल्याने अथवा झोपेची प्रत कमी झाल्याने इम्युनिटीवर विपरीत परिणाम होतो का? जखम बरी होण्यासाठी ‘झोप’ आवश्यक असते. कुठल्याही मोठ्या शस्त्रकियेनंतर जेंव्हा उत्तम झोप लागू लागते तेंव्हा घाव लवकर भरून येतात. आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक यंत्रणा २४ तास दक्ष असते. आपला मेंदू आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती या दोघांमध्ये एक साम्य आहे- दोघेही बाह्य परिस्थितीला प्रतिसाद देतात आणि दोघेही काही गोष्टी स्मृतीमध्ये साठवून ठेवतात! रोग प्रतिकारक यंत्रणेची रचना बरीच गुंतागुंतीची आहे.

लष्कराचे उदाहरण घ्या. आपले लष्कर हे जवानांनी बनते, त्याचप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती ही प्रामुख्याने ‘पांढऱ्या’ पेशींची बनलेली असते. जशा लष्करात भूसेना, नौसेना, वायुसेना असतात तसे या पेशींचे न्युद्रोफील, टी सेल, ‘बी’ सेल असे प्रकार असतात. जवानांकडे जशी वेगवेगळी आयुधे (काडतुसे, बॉम्बगोळे, मिसाइल्स) असतात, त्याचप्रमाणे या पेशींकडेदेखील विविध उत्प्रेरेके (Enzymes), पेशीद्रव्ये (Cytokines) असतात. एखाद्या जीवाणू किंवा विषाणूला भस्म करून टाकण्याची अथवा गिळून पचन करण्याची क्षमता काही पेशींत असते. यामधील B-Cells या विशेष प्रकारच्या जवानांकडे ‘प्रतिद्रव्य’ (Antibody) तयार करून त्याचा मारा करायची क्षमता असते. T- Cells नावाचे जवान विषाणूंशी दोन हात करून त्यांना नष्ट करतात.

या सर्व जवानांचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे ठरते. आपले कोण आणि शत्रू कोण? हे स्मरणात ठेवून लढणे अतिआवश्यक ठरते! हे जवान आपल्याच देशातील जनतेवर हल्ला करू लागले तर?  असे होऊ नये यासाठी T-Helper (T H) पेशी या तैनात असतात. या T H पेशींची स्मृती दीर्घकाल असते! एखाद्या विशिष्ट विषाणूने काही वर्षांनंतर परत हल्ला केला तर या T H पेशी ते ओळखून त्या विषाणूला प्रतिबंधक असलेल्या कमांडो B पेशींना कार्यरत करतात आणि हल्ला परतवतात! लहानपणीच झालेला गोवर किंवा कांजिण्या परत परत होत नाहीत याचे हेच कारण आहे.आपण घेतलेल्या झोपेमुळे या T H पेशींतील स्मरणशक्ती पुष्ट होते! हे कसे होते? ह्याचे विवेचन पुढील लेखात!

(लेखक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस येथे कार्यरत आहेत)
iissreports@gmail.com

Web Title: Is ‘immunity’ related to sleep? Find out the opinions of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.