झोपायचं तरी किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 09:40 AM2022-07-17T09:40:13+5:302022-07-17T09:41:07+5:30
अन्न आणि झोप हे आपल्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत.
डॉ. जलील पारकर, लीलावती रुग्णालय
अन्न आणि झोप हे आपल्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. ज्यांचे झोपेचे गणित बिघडते, त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते, असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. भारतासह संपूर्ण जगात या विषयावर पुरेसे संशोधन झाले असून, पुरेशी झोप किती महत्त्वाची, हे अधोरेखित झाले आहे. ज्या व्यक्तीची झोप व्यवस्थित असते, तिचे आरोग्य उत्तम असल्याचे सर्वच जाणकारांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कमीत कमी ६-७ तास झोप ते जास्तीत जास्त ८ तास झोपणे आवश्यक आहे.
नोकरीच्या ठिकाणी असलेल्या स्पर्धात्मक वातावरणामुळे गेल्या काही वर्षांत तरुणांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हेही झोपेचे वेळापत्रक बिघडविण्यासाठी कारण ठरत आहेत. कामामुळे किंवा सोशल मीडिया वा ओटीटी यांमुळे आजकालचे तरुण रात्र-रात्र जागे असतात. त्यामुळे झोपेच्या सवयीचा पॅटर्न बदलल्याचे दिसून येते. अनेक जण हव्या त्यावेळी झोपतात व हव्या त्यावेळी उठतात. झोप हा विषय एवढ्या सहजतेने घेऊन चालणे योग्य नाही. पुरेशी झोप हा गंभीर विषय आहे.
‘स्लीप स्टडी’सारख्या वैद्यकीय चाचण्या आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीची झोप किती आणि कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास केला जातो. त्या व्यक्तीच्या अन्य व्याधीचे निदान या चाचणीतून निश्चित करून त्यावर उपचार केले जातात. वयोमानानुसार झोपेच्या सवयी बदलत जातात. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या झोपेचा कालावधी कमी होतो, ते सहा तास झोपतात.
निद्रानाशाची व्याधी
झोप आणि मेंदूचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे झोप अपुरी झाली तर मेंदूचे कार्य बिघडते. त्यामुळे चिडचिड वाढणे, दिवसा झोप येणे, स्मरणशक्ती मंदावणे, आदी परिणाम जाणवू लागतात. काहींना तर निद्रानाशासारख्या व्याधींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्ती अनेकदा मानसिक तणावाखाली असतात. अनेक जण झोप यावी म्हणून दारूच्या आहारी जातात. हेही घातकच. नैसर्गिक झोप ही महत्त्वाची आहे.
शरीर यंत्र नव्हे...
शरीर हे यंत्र नाही. दोन दिवस जागरण करून तिसऱ्या दिवशी झोप भरून काढू असे होत नाही. या पद्धतीने झोप भरून निघत नाही. दररोज पुरेसा व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार गरजेचे आहे. जंकफूड टाळा. कॅफिन, तत्सम पेय, अल्कोहोलच्या सेवनामुळे झोपेच्या कार्यात बिघाड निर्माण होऊ शकतात. झोपेची व झोपेतून उठण्याची वेळ ठरलेली असावी. ज्या खोलीत झोपतो, तिथे इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा (टीव्ही, मोबाईल, आदी) वापर होणार नाही याची काळजी घ्यावी.