लहान मुलांसाठी फार गरजेचे आहेत नाश्त्यासंबंधीचे 'हे' नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 09:56 AM2019-01-12T09:56:05+5:302019-01-12T09:59:28+5:30
लहान मुलांसाठी नाश्ता तयार करणे नेहमीच कठीण ठरतं आणि त्याहीपेक्षा कठीण असतं ते लहान मुलांमध्ये हेल्दी खाण्याची सवय डेव्हलप करणं.
(Image Credit : www.bubhub.com.au)
लहान मुलांसाठी नाश्ता तयार करणे नेहमीच कठीण ठरतं आणि त्याहीपेक्षा कठीण असतं ते लहान मुलांमध्ये हेल्दी खाण्याची सवय डेव्हलप करणं. त्यामुळे हे याची काळजी घेणे गरजेचं असतं की, लहान मुलांसाठी नाश्ता तयार करताना तो हेल्दी असण्यासोबतच टेस्टी असावा. जेणेकरुन त्यांनी आवडीने ते खावं. इतकेच नाही तर लहान मुलांमध्ये हेल्दी आहाराची सवय लावण्यासाठी काही नियमही गरजेचे आहेत. ते काय हे पाहुयात...
पोषक तत्त्वे असलेला ब्रेकफास्ट
सकाळी-सकाळी लहान मुलांना वेळेवर तयार करुन शाळेत पाठवणे फारच धावपळीचं काम असतं. अशावेळी मुलांच्या नाश्त्याबाबत फारच घाई केली जाते. पण मुलांना नाश्त्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यांनी तो शांतपणे खायला हवा. यात तुम्हाला जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण हे लहान मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे.
घरचा हेल्दी नाश्ता
लहान मुलांच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी सर्वात चांगला म्हणजे घरी तयार करण्यात आलेला नाश्ता. यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, पराठे यांचा समावेश करता येईल. लहान मुलांच्या नाश्त्यासाठी पॅकेटमध्ये येणाऱ्या पदार्थांचा अजिबात वापर करु नये. कॉर्नफ्लेक्स, ओट्स किंवा पॅकेटमधील ज्यूस अजिबात त्यांना देऊ नये. त्यांच्यासाठीचा हेल्दी नाश्ता घरीच तयार करा.
वडिलांनी घ्यावी ही काळजी
अजूनही आपल्या देशात लहान मुलांना शाळेत पाठवण्यापासून ते त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींची जबाबदारी ही केवळ आईवर असते. पण आता वेळ आली आहे की, वडिलांनीही ही आपली जबाबदारी समजावी. लहानु मुलांना चांगला काहीतरी तयार करुन देणे किंवा त्यांच्यासाठी नाश्ता तयार करणे ही केवळ आईचीच जबाबदारी नसते. शिवाय बाबांनी काहीतरी स्वत:च्या हातांनी तयार केलंय म्हणून मुलं आवडीने ते खातीलही.
या सवयी लावा
जर तुमची मुलं-मुली ७ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असेल तर त्यांना नाश्ता टेबलवर किंवा जागेवर नेऊन देण्याऐवजी त्यांना स्वत: घ्यायला सांगा. ही सवय लावल्याने त्यांना जेव्हाही भूक लागेल तेव्हा ते कुणी वाढून येईल याची वाट बघत बसणार नाही.
नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम
सकाळी उठल्यावर अनेकदा आपण काही न खाताच घराबाहेर पडतो. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, नेहमी नाश्ता करणाऱ्या १०.९ टक्के लोकांच्या तुलनेत सकाळी नाश्ता न करणारे २६.७ टक्के लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या संशोधनासाठी एका दलाने २००५ ते २०१७ पर्यंत ३४७ लोकांच्या नाश्ता करण्याच्या सवयीचा अभ्यास केला. यामध्ये सहभागी करण्यात आलेल्या व्यक्तींचं वय १८ ते ८७ वर्ष होतं. संशोधनात यांची उंची, वजन, कंबर यांची मापंदेखील घेण्यात आली.
अमेरिकेतील मेयो क्लिनिकमधील संशोधक केविन स्मिथ यांनी सांगितले की, जर तुम्ही कधीतरीच नाश्ता करत असाल तर ते शरीराच्या मध्यभागातील अवयवांमध्ये म्हणजेच पोटाच्या भागात वजन वाढण्याचं कारण ठरतं. परंतु ज्या व्यक्ती कधीच नाश्ता करत नाहीत. त्यांना लठ्ठपणाचा त्रास सहन कराव लागतो. ज्या लोकांनी कधी नाश्ता नाही केला. त्यांनी मागील काही वर्षात स्वतः वजन वाढल्याचे मान्य केलं आहे.