मुलांच्या आहारात समाविष्ट करा या गोष्टी; मुलं होतील तल्लख आणि हुशार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 08:18 PM2021-06-06T20:18:35+5:302021-06-06T20:19:39+5:30
मुलांना अधिक पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. लहान मुलांना नेमका कसा आहार द्यावा हे जाणून घेऊया.
प्रत्येक पालकांना वाटत असते की आपली मुले हुशार व तल्लख व्हावीत. त्यामुळे ते लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेतात. उत्तम आहारामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूचे कार्य सुधारते. त्यामुळेच मुलांना अधिक पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. लहान मुलांना नेमका कसा आहार द्यावा हे जाणून घेऊया.
ओट्स
लहान मुलांना ओट्स आवर्जुन दिले पाहिजेत. ओट्स मेंदूसाठी उत्तम आहेत. त्यामध्ये फायबर जास्त प्रमामात असते. ओट्समध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स असते. ज्यामुळे मुलांचा मेंदू तल्लख होतो. आपण सफरचंद, केळी, ब्लूबेरी आणि बदाम यांचा ही मुलांचा आहारात समावेश करा.
डार्क चॉकलेट
चॉकलेट म्हणजे लहान मुलांचा विक पॉईंट. मात्र जास्त चॉकलेट खाणे लहान मुलांसाठी चांगले नसते अशावेळी आपण त्यांना इतर चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट खाण्यासाठी दिले पाहिजे. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. ते आपल्या शरीरातील ताण कमी करू शकतात. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यानेही नुकसान होऊ शकते.
अव्हाकॉडो
अव्हाकॉडोला एक सुपर फूड म्हटले जाते. त्यात ओमेगा -३ फॅटी अॅसिडस्, फायटोकेमिकल्स, फायबर अशा गोष्टी असतात. अव्होकाडोमध्ये पोटॅशियमही असते. यामुळे मुलांच्या दररोजच्या आहारात अॅव्होकॅडोचा समावेश करा
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि फायबर असते. मुलांच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश हा केलाच पाहिजे. तसेच त्यांच्या आहारात टोमॅटो, रताळे बटाटे, भोपळा, गाजर याचाही समावेश करा.
दूध, दही आणि चीज
दूध, दही आणि चीजमध्ये प्रथिने आणि बी जीवनसत्त्वे जास्त असतात. या पदार्थांमध्ये कॅल्शियम देखील जास्त असते, जे मजबूत आणि निरोगी दात आणि हाडे विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे मुलांच्या आहारात दूध दही आणि चीज या पदार्थांचा समावेश करा.