कोरोनामुळे नवीन आजाराला निमंत्रण, 'या' जीवघेण्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; संशोधनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:28 PM2021-09-12T14:28:29+5:302021-09-12T14:30:03+5:30
एका खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता.
गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत नागरिकांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. कोरोना महामारी दरम्यान चिंता आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीममध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, १ हजार २११ लोकांचे प्रतिसाद नोंदवले गेले. त्यापैकी १ हजार ६९ लोकांच्या प्रतिसादांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातुन निघालेल्या निष्कर्षानुसार, ४४.६ टक्के लोकांमध्ये चिंतेची सौम्य लक्षणं दिसून आली. त्याच वेळी, चिंतेची मध्यम लक्षणं ३०.१ टक्के लोकांमध्ये आढळली तर गंभीर चिंता असणारी लक्षणं २५.३ टक्के इतकी होती.
तसेच या अभ्यासानुसार, २६.१ टक्के लोकांमध्ये सौम्य डिप्रेशन असल्याचं दिसून आलं. १६.७ टक्के लोकांमध्ये मध्यमआणि ३.८ टक्के लोकांमध्ये गंभीर डिप्रेशन होतं. लॉकडाऊनच्या चार आठवड्यांत लोकांकडून सेल्फ स्टडीच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला. यात सहभागी झालेले सर्व लोक भारताचे नागरिक होते आणि त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त होते.
डॉक्टरांनी सांगितलं की, कोणत्याही मोठ्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही. या अभ्यासात वेब आधारित सर्वेक्षण करण्यात आले.