हायपोथायरायडिझमचे प्रमाण वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:10 PM2018-04-07T15:10:13+5:302018-04-07T15:10:13+5:30
रक्तदाब, मधुमेह याबरोबरच आता थायरॉईड रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांपेक्षा महिलांमधील हार्मोन्स झपाट्याने बदलत असल्यामुळे थायरॉईड विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : रक्तदाब, मधुमेह याबरोबरच आता थायरॉईड रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांपेक्षा महिलांमधील हार्मोन्स झपाट्याने बदलत असल्यामुळे थायरॉईड विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून, तिचा आकार फुलपाखरासारखा असतो.
गळ्याच्या खालच्या भागात मध्यभागी ही ग्रंथी असते. शरीराच्या चयापचयाचा वेग नियंत्रित ठेवणे, त्यासाठी थायराईड संप्रेरकांची निर्मिती करणे, हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे. हायपोथायराईडीझम या आजारात या संप्रेरकांची निर्मिती कमी होत असल्यामुळे चयापचयाचा वेग मंदावतोे. हा आजार काही रूग्णांना आयुष्यभर सहन करावा लागतो. काही कुटुंबांमध्ये अनुवांशिकरित्या थायरॉईडचा आजार होतो. कुटुंबातील एका व्यक्तिला थायरॉईडचा त्रास झाल्यास अनुवांशिकरित्या पुढील पिढीमध्ये जातो. त्यामुळे थायरॉईडचा त्रास असणाºयांनी किमान सहा महिने, वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. या आजारात इम्यू सेल्स शरीरातील सेल्सवर हल्ला करतात. यामुळे टाईप १ मधुमेहसारख्या आॅटो इम्यू आजारात थायरॉईड चाचणी करणे आवश्यक आहे. अति ताणतणाव थायरॉईडसाठी कारणीभूत आहे. जितका ताण अधिक तितका हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार तीव्र होतो. ताण न घेता व नियमित योगासने, व्यायामाव्दारे थायरॉईडवर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाढते वय हे देखील एक कारण आहे. वय वाढते तशी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
थायरॉईडची कारणे, चाचण्या व उपचार
शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच थायराईड ग्रंथींच्या विरूध्द कार्य करून थायराईड ग्रंथीला नष्ट करते. हे या रोगाचे सर्वांत जास्त आढळून येणारे कारण आहे. काही आजारांमध्ये थायरॉईडची शस्त्रक्रिया करून ती ग्रंथी पूर्णपणे काढण्यात येते. किरणोत्सराचा उपचार, विषाणंूचा परिणाम, जन्मत:च ग्रंथी नसणे, अशीसुध्दा कारणे आहेत. आयोडिनच्या कमतरतेमुळे किंवा अधिक सेवनामुळेही हा आजार होतो. मात्र, हे कारण फार कमी आहे. हायपोथायराईडीसमचे निदान करण्यासाठी टी ३, टी ४ टी एसएच या तपासण्या करणे आवश्यक आहे.
तणावपूर्ण जीवनशैली कारण
थायरॉईड हा प्रामुख्याने महिलांमध्ये होणारा आजार आहे. पुरूषांपेक्षा महिलामंध्ये हार्मोन्स बदल अधिक होतात. नैसर्गिकरित्या होणाºया या बदलाचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या वयोमानानुसार प्रत्येक टप्प्यात बदल होत असतात. मासिक पाळी सुरू होणे, गर्भधारणा, बाळंतपण, मासिक पाळी बंद होणे, यावेळी हार्मोन्स बदल झपाट्याने होतात. तणावपूर्ण जीवनशैली हे थायरॉईड विकाराचे मुख्य कारण आहे. सुरूवातीच्या टप्प्यात नियमित औषधोपचाराने नियंत्रण मिळविता येते.
लक्षणे
दैनंदिन कामामध्ये निरूत्साह जाणवणे, कमालीचा थकवा वाटणे, मलाविरोध होणे, अचानक वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावरील केसांची लव अतिप्रमाणात दिसू लागणे, घशाला सूज येणे अशी लक्षणे दिसू लागतातच थायरॉईडची शक्यता असते. थकवा व अशक्तपणा जाणवत असतानाच हातापायांना व चेहऱ्याला सूज येणे थायरॉईड ग्रंथीला सूज येणे (गॉयटर) वजन वाढणे, संधीवात होणे, हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे. वंध्यत्व येणे. विसराळूपणा वाढणे, मानसिक ताणतणाव वाढणे, केस जास्त गळणे, केस रूक्ष व रखरखीत होणे या तक्रारीने रूग्ण त्रस्त होतात.
आयोडिन सेवन
आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी आयोडिन आहारात घेणे, हेदेखील थायरॉईडचे कारण आहे. शरीराला रोज १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची आवश्यकता असते. यामुळे जास्त किंवा कमी सेवनामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.