खरंच... नारळ पाणी प्यायल्याने कर्करोग बरा होतो ?, टाटा रुग्णालयाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 09:08 PM2019-05-17T21:08:33+5:302019-05-17T21:08:41+5:30
सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात.
मुंबई : सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे कुठल्याही पातळीवर त्याची विश्वासार्हता तपासली जात नाही. परिणामी ‘व्हायरल’ मेसेजसचा ताप दिवसागणिक वाढतोय. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालय या ‘व्हायरल’ तापाला ब-याचदा सामोरे जाते. मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया नारळ पाणी उकळून प्यायल्यास कुठल्याही प्रकारचा कर्करोग बरा होत असल्याचा टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे मेसेज व्हायरल होत आहे. हा संदेश चुकीचा असल्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रकाद्वारे टाटा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
याविषयी, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पत्रकात म्हटले आहे की, टाटा कर्करोग वा माझ्या नावे सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेश साफ चुकीचा व खोटा आहे. नारळ पाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्यूमरचा समूळ नाश होत असल्याचे म्हटले आहे, मात्र हा दावा साफ चुकीचा आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे संशोधन झाले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या संदेश वा पोस्टची विश्वासार्हता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये वा अथवा फॉरवर्ड करू नये.
यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या नावे अशा अनेक व्हायरल पोस्ट्समुळे कर्करोगाविषयी चुकीचे समज पसरत असल्याचे उघड झाले आहे. टाटा रुग्णालयाचे डॉ. मकरंद देशपांडे यांच्या नावेही असा चुकीचा संदेश व्हायरल झाला होता, मात्र या नावाचे कुणीही डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न नसून ती माहिती चुकीची असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला होता.