शर्करायुक्त शीतपेयांच्या सेवनात भारत तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:09 AM2019-12-18T06:09:07+5:302019-12-18T06:09:15+5:30
लॅन्सेटचा अहवाल; स्थूलता, वजन न वाढण्याच्या समस्यांचा धोका
स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर शर्करायुक्त शीतपेयांच्या सेवनात भारत तिसºया क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेटच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. परिणामी, यामुळे देशातील स्थूलता व वजन न वाढण्याच्या समस्येचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
आईसक्रीम, शीतपेये व शर्करायुक्त सुगंधित पेये यांच्यामध्ये अति प्रमाणात साखरेचा व रसायनांचा वापर केलेला असतो. त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. शीतपेय, एनर्जी ड्रिंंक्समध्ये असंख्य रसायने वापरली जातात. प्रामुख्याने फॉस्फोरिक अॅसिड, कॅफीन, अस्पारटम, विविध कृत्रिम रंग व कार्बन डायआॅक्साइड व अॅल्युमिनियमचा वापर होतो. फॉस्फोरिक अॅॅसिडच्या परिणामी शीतपेयातील आम्लता वाढते व कार्बन डायआॅक्साइडचे शोषण अत्याधिक केले जाते. शीतपेयातील कार्बन डायआॅक्साइड कार्बोनिक अॅसिड या स्वरूपात शोषले जाते. ते शोषले गेल्यामुळे हाडांतील कॅल्शियम कमी होऊन ते मूत्रावाटे शरीराबाहेर जाते. यामुळे दात, मणक्यांची हाडे व कमरेची हाडे ठिसूळ होतात. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने, आॅस्टिओ आर्थरायटिस, मूतखडा किंवा रक्तवाहिन्यांचे काठिन्य पातळी वाढू शकते. फॉस्फोरिक अॅॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशिअम व कॅल्शियमचेही संतुलन बिघडते, असे आहारतज्ज्ञ डॉ. शैशवी नारकर यांनी सांगितले.
शीतपेयांमधील अनावश्यक साखरेने स्थूलता, अनुषंगिक आजार वाढतात. या साखरेने हाडे ठिसूळ होतात, प्रतिकारक्षमता कमी होते. हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. कॉपर, झिंक व क्रोमिअम या धातूंची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्या यकृताचे, त्वचाविकार उद्भवू शकतात.
अनेकदा शर्करायुक्त शीतपेयांमध्ये फळांचे कृत्रिम सुगंध व कृत्रिम रंग वापरले जातात, या अत्याधिक वापराने मुलांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. अटेन्शन डेफिसिट डिसआॅर्डरसारखे विकार निर्माण होतात. यामुळे मुले तापट होणे, त्यांच्यात चीडचीड निर्माण होणे, अशी लक्षणे दिसून येतात.
शीतपेयांमुळे येणारे ढेकरही घातकच
शीतपेय घेतल्याने जे ढेकर येतात, त्यामुळे लोकांना अन्न पचले असे वाटते, पण ते चुकीचे आहे. फॉस्फोरिक अॅसिडमुळे आतड्यातील सूक्ष्म जिवाणूंचा स्तर बिघडतो व अन्य आतड्यांचे आजार निर्माण होतात. शीतपेयांमधील कॅफीनमुळे गॅमा लिनोलेनिक अॅसिडचे रूपांतर अॅर्चिडॉनिक अॅसिडमध्ये होते. परिणामी, प्रोस्टेग्लँडिनचे प्रमाण वाढून सूक्ष्म पेशींवर सूज निर्माण होते.
दरवर्षी १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू
लॅन्सेटच्या अहवालातील निरीक्षणानुसार, जागतिक स्तरावर भारत हा शर्करायुक्त शीतपेयांच्या उत्पादनातही पहिल्या पाच स्थानांत आहे. यात चिली, दक्षिण आफ्रिका, फिलीपाइन्स, मलेशिया या देशांचा समावेश आहे. शर्करायुक्त सोडा, स्पोटर््स ड्रिंक्स, फळांपासून बनविलेली पेये, यामुळे जगात दरवर्षी १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू होतो. साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात सेवन केल्याने, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये हे मृत्यू झाले आहेत.