हे पन्नाशीतले कलाकार तुम्हाला देतात फिटनेससाठी प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 01:20 PM2017-12-14T13:20:54+5:302017-12-14T19:54:56+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आणि मॉडेल आहेत ज्यांच्या फिटनेसकडे पाहता त्यांच्या वयाचा आकडा खोटा वाटतो.

indian celebrities at the age of 50 gives you fitness causes | हे पन्नाशीतले कलाकार तुम्हाला देतात फिटनेससाठी प्रेरणा

हे पन्नाशीतले कलाकार तुम्हाला देतात फिटनेससाठी प्रेरणा

Next
ठळक मुद्देतरुण असणं किंवा नसणं हे आपल्या मानण्या न मानण्यावर अवलंबून आहे.तुम्ही वयाच्या ७० व्या वर्षीही तरुण राहू शकता, केवळ तुमची इच्छाशक्ती आणि मेहनत त्यासाठी हवी.आजही बॉलिवुडमध्ये असे कलाकार आहेत, ज्यांना वयाच्या ५० व्या वर्षीही हिरोची भूमिका साकारायला मिळते. 

मुंबई : तरुण असणं किंवा नसणं हे आपल्या मानण्या न मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही वयाच्या ७० व्या वर्षीही तरुण राहू शकता, केवळ तुमची इच्छाशक्ती त्यासाठी हवी. गेली २ ते ३ दशकं गाजवणारी अनेक बॉलीवूड कलाकार आजही तितकीच तरुण आणि चार्मिंग दिसतात. अर्थात त्यासाठी हार्ड डाएट, जीम या गोष्टी आहेतच. पण डाएटची पथ्य पाळणं आणि नियमित जीम करणं किती कठीण आहे हे तुम्हालाही ठाऊक आहे. पण तरीही हे कलाकार सदैव तरुण दिसण्याकरता अशाप्रकारे मेहनत घेताना दिसतात. आजही बॉलिवुडमध्ये असे कलाकार आहेत, ज्यांना वयाच्या ५० व्या वर्षीही हिरोची भूमिका साकारायला मिळते. 

सलमान खान

मैने प्यार कियामधला प्रेम आठवतोय?सडसडीत बांध्याचा तेव्हाचा सलमान आणि आताच सलमान यात बराच फरक आहे. मात्र  तरीही त्या दोन्ही व्यक्तिमत्वात एकच साम्य आहे. ते म्हणजे त्यांचं तरुण असणं. तो आजही तितकाच चार्मिंग दिसतो. म्हणूनच तो वयाच्या ५२ व्या वर्षातही कित्येकांची फॅन्सचा क्रश बनलाय. जेव्हा सलमान खानचं शेड्युल्ड व्यस्त असतं, तेव्हा रात्री २ वाजता उठून व्यायाम करतो. तो दिवसाला ४ अंडी खातो, तसंच दूध, ५ चपात्या, फळं, मांसाहारी अशा पदार्थांचा समावेश त्याच्या जेवणात असतात. म्हणूनच तो आजही एकदम फिट आहे.

जावेद जाफरी

अभिनय, नृत्य, कोरिओग्राफर, अॅड फिल्ममेकर अशा विविध कलेत निपुण असलेला जावेद जाफरीनेही त्याची पन्नाशी पार केलीय. मात्र तरीही तो आजही एखाद्या हँडसम तरुणाप्रमाणेच दिसतो. एका मुलाखतीत त्यानं म्हटलं होतं डान्स करणं हे एकप्रकारचं वर्कआऊटच आहे. विनोदी प्रकारचा व्यायाम म्हणून आपण नृत्याकडे पाहायला हवं. नृत्य करणं हेच त्याच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे. तसंच, नियमित योग्य आहार घेणंही गरजेचं असतं असं जावेद जाफरी म्हणतो. 

माधुरी दिक्षित

‘वय वाढत जाण्याला मी घाबरत नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही कसेही असा, तसं स्वत:ला स्विकारा’ असं माधुरी दिक्षित सांगते. तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावरच ती किती आत्मविश्वासू आहे हे जाणवतं. धकधक गर्ल म्हणून ओळख असणारी ही ५० वर्षांची माधुरी आजही कित्येकांच्या मनात वसली आहे. कथ्थक, योगा आणि खेळ हे तिच्या तारुण्याचं रहस्य आहे. नृत्याची बिजली म्हणून ओळख निर्माण करणारी माधुरी तिच्या नियमित नृत्य सरावामुळे आजही तितकीच फ्रेश दिसते, जितकी ती आपल्याला देवदासमधील चंद्रमुखीच्या भूमिकेत दिसली होती. 

शेखर सुमन

शेखर सुमनच्या फिटनेशविषयी मध्यंतरी एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. वयाच्या ५४ व्या वर्षीही त्याने जिम करून इतर तरुण कलाकरांच्या तोंडाला पाने पुसली होती. ते आजही जिममध्ये घाम गाळताना दिसतात. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास असे चार ते व्यायाम करतात. त्यामध्ये सायकलिंग, कार्डिओ, स्विमिंग असे प्रकार नियमित असतात. आपल्याला शरीराला योग्य चालना मिळण्याकरता असे व्यायाम प्रकार अत्यंत महत्त्वाचं असल्याचे ते सांगतात. त्याचप्रमाणे ते खाण्या-पिण्याच्या बाबतीतही अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतात. तेलकट-तुपकट  पदार्थ त्यांनी स्वत:साठी वर्ज्य केलेत. 

मिलिंद सोमण

वयाच्या ५१ व्या वर्षी २० वर्षाच्या तरुणीला डेटिंग करत असल्याने सध्या चर्चेत आलेला मिलिंद सोमणविषयी आणखी काही जास्त सांगायची गरज नाही. २० वर्षांच्या तरुणाच्या एनर्जीलाही लाजवेल असं व्यक्तीमत्व मिलिंद सोमणंच आहे. ३.८ किमी स्विमिंग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे सगळं अवघ्या १६ तासात केवळ मिलिंद सोमणंच करू शकतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे स्वत:चे दिल्लीत दोन जिम आहेत. पण फिट राहण्यासाठी त्यांनी कधीच जिमचा वापर केला नाही. बॉडीबिल्डिंगसाठी जिम महत्त्वाचं असलं तरीही फिट राहण्याकरता जिम मदत करत नाही. फिट राहण्याकरता आपण आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण आणलं पाहिजे.  

अामिर खान 

या व्यक्तिमत्वाविषयी अधिक काही सांगण्याची गरज आहे का? २००९ साली प्रदर्शित झालेला थ्रीडी आणि गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला दंगल या दोन्ही चित्रपटातील आमिर खानची भूमिका परस्पर विभिन्न होती. मात्र तरीही त्याने ती लिलया पेलली. दंगल चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत वाखणण्याजोगी आहे. तसंच, त्याआधी प्रदर्शित झालेला गजनी या चित्रपटातील त्याच्या बॉडीवर अनेक तरुणाई फिदा झाली होती. नियमित व्यायाम, संतुलित आहार या गोष्टी सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असं ५४  वर्षीय अमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

अर्जून रामपाल

‘वर्क आऊट करण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे दुपारी १२ वाजता. चेस्ट-बॅक आणि चेस्ट-बाईप्स अशा दोन प्रकारे रोज व्यायाम केला तर आपलं शरीराला एकाच व्यायाम प्रकाराची सवय होत नाही. त्यामुळे आपण कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकतो,’ असं ते एकदा एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावरूनच त्यांचं जिमवरचं प्रेम आणि त्यामुळे त्यांचं कमी होत जाणारं वय कळतं. वयाच्या ४५ व्या वर्षीही तो अाठवड्यातून ५ दिवस व्यायाम करतो. मुळातच त्याची निर्सगत: लाभलेली उंची आणि व्यायाम करून मिळलेलं आकर्षक शरीर यावर सगळीच तरुणाई अर्जून रामपालवर फिदा आहेत.

फिटनेससंदर्भात इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

शाहरुख खान

शाहरुख खानच्या यंग लुकविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. त्याच्या या लुकमागे संतुलित आहार असल्याचं त्याने अनेकदा सांगितलंही आहे. आजही त्याला तरुण वयातल्या भूमिका मिळतात. यातच त्याच्या संतुलित आहारचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. गेल्या दोन दशकापासून शाहरुख खान प्रशांत सावंत नावाच्या ट्रेनरच्या हाताखाली ट्रेनिंग घेतोय. 8 अ‍ॅब्स कठीण आहे अशातला भाग नाही. कोणीही 6 ते 8 अ‍ॅब्स बनवू शकतात. मात्र त्यासाठी नियमिततेची गरज असते. शाहरूख खानने ती नियमितता पाळलीय. म्हणूनच वयाच्या 53व्या वर्षीही त्याने 8 अ‍ॅब्स कायम ठेवलेत. आठवड्यातून 5 दिवस तो व्यायाम करतो. 1 तास 20 मिनिटे त्याचा व्यायाम चालतो. 

अक्षय कुमार

बॉलिवूड इंडस्ट्रीमधला खिलाडी म्हणजे अक्षय कुमार. मार्शल आर्टमध्ये करिअर करता यावं याकरता अक्षय कुमारने त्याचं शिक्षण सोडलं होतं. मार्शल आर्टमुळेच तो आजही हॉट लुकमध्ये दिसतो. त्याच्या फिटनेस रहस्य आहे, लवकर झोपून लवकर उठणे. शेड्युल नसेल तेव्हा तो रात्री 9 वाजात झोपतो आणि पहाटे 4.30 वाजता उठतो. 6 किंवा 8 अ‍ॅब्ससाठी त्याने कधीच व्यायाम केला नाही. गेल्या 32 वर्षांहून अधिक काळ तो व्यायम करतोय, मात्र तरीही त्याचे अद्याप 6 किंवा 8 अ‍ॅब्स झालेले नाहीत, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

आणखी वाचा - मानुषी छिल्लरसारख्या परफेक्ट फिगरसाठी या गोष्टी नक्की ट्राय करा.

मंदिरा बेदी

आजच्या सगळ्याच मुलींचा आदर्श म्हणजे मंदिरा बेदी. आपल्या चार्मिंग लुकवरून आजही ती कित्येकांची आवडती आहे. खतरो खिलाडीमधून तिचा एक वेगळाच लुक लोकांसमोर आला आणि तिथूनच तिला फिट राहण्याची सवय लागली. ती नियमित जिम तर करतेच शिवाय स्विमिंग, धावणे असे प्रकारही तिला फार आवडतात. तिचे जिममधले फोटो मध्यंतरी प्रचंड व्हायरल झाले होते. वयाच्या 45 व्या वर्षीही तिनं आपली बॉडी मेनटेन ठेवली आहे, त्यामुळे अनेक नेटिझन्सने तिचं कौतुकही केलंय. ती प्रचंड फिरते. पण प्रत्येकवेळी तिला जिम मिळेलच असं नाही. मग हॉटेलमध्येच ती काहीतरी व्यायम करून आपला घाम गाळण्याचा प्रयत्न करते. तिच्या या सातत्यामुळेच तिची बॉडी एकदम फीट आहे. 

Web Title: indian celebrities at the age of 50 gives you fitness causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.