इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेटपेक्षा चांगले का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 11:24 AM2018-12-14T11:24:22+5:302018-12-14T11:25:45+5:30
आता लोक हळूहळू इंडियन टॉयलेटचा वापर कमी करु लागले आहेत. पण वास्तविक पाहता ही आपल्याकडून होत असलेली एक मोठी चूकच मानली जाते.
फार पूर्वीपासून भारतीय हे पाश्चिमात्य संस्कृतीने प्रभावित होत आहेत. त्यांच्यासारखा परिधान, त्यांच्यासारखं राहणीमान आणि त्यांची संस्कृती नेहमीत भारतीयांसाठी आकर्षण राहिली आहे. पण या पाश्चिमात्य सभ्यता अंगिकारत असताना आपण आपल्या परंपरा विसरत तर नाही आहोत ना? हा मोठा प्रश्न आहे. कारण कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या लाइफस्टाइलमध्ये पाश्चिमात्य लाइफस्टाइलचा शिरकाव होऊ देत आहोत. यात वेस्टर्न टॉयलेटचाही समावेश आहे.
आता लोक हळूहळू इंडियन टॉयलेटचा वापर कमी करु लागले आहेत. पण वास्तविक पाहता ही आपल्याकडून होत असलेली एक मोठी चूकच मानली जाते. नेहमीच यावर वाद-विवाद होतो की, इंडियन टॉयलेट अधिक चांगले आहेत की, वेस्टर्न टॉयलेट. या शंकेचं किंवा वादाचं निरसन करण्यासाठी या लेखातून आम्ही तुम्हाला काही वैज्ञानिक तथ्य सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा की, कोणतं टॉयलेट अधिक चांगलं आहे.
इंडियन टॉयलेट जास्त स्वच्छ
हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की, भारतीय शौचालय ही पाश्चिमात्य शौचालयांच्या तुलनेत अधिक स्वच्छ आहेत. कारण भारतीय शौचालयात शौचालयाच्या सीटसोबत तुमच्या शरीराचा तसा फार जास्त संबंध येत नाही. याने तुम्हाला यूरिन इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. मात्र पाश्चिमात्य शौचालयात सीट आणि शरीराचा संबंध येतो. तेच दुसरा मुद्दा हा की, पाश्चिमात्य शौचालयाचा वापर करणारे लोक स्वच्छतेसाठी टॉयलेट पेपरचा वापर करतात. तर भारतीय शौचालयात पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे स्वच्छता अधिक चांगली केली जाते. त्यामुळे भारतीय शौचालय अधिक स्वच्छ आणि चांगले असतात असे मानले जाते.
नैसर्गिक विधीसोबतच व्यायामही
भारतीय शौचालयांचा वापर करणे एकप्रकारे व्यायाम करण्यासारखंच आहे. हा एकप्रकारचा स्क्वाट व्यायाम आहे. अशा स्थितीत बसल्याने आपल्य पायांना मजबूती आणि गती मिळते. तसेच असे बसल्याने शरीरात रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. तेच पाश्चिमात्य शौचालयाच्या सीटवर तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसता. पण यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची अॅक्टिविटी करत नाहीत.
पचनक्रिया होते चांगली
भारतीय शौचालयाचा वापर करुन आपली पचनक्रिया चांगली होते. असे बसल्याने पोटावरील दाब योग्य पद्धतीने वाढतो आणि त्यामुळे योग्यप्रकारे तुम्ही शौच करु शकता. तुम्हाला स्वत:हून जोर लावण्याची गरज पडणार नाही. तेच पाश्चिमात्य शौचालयात पोटावर किंवा पोटाखालील भागावर काहीच दबाव पडत नाही. त्यामुळे तुम्ही योग्यप्रकारे किंवा सहजपणे शौच करु शकत नाहीत.
वापर करण्यासही सोपं
भारतीय शौचालयाची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचा वापर फार सहज आणि सोपा आहे. यासाठी तुम्हाला फार काही कसरत करावी लागत नाही. मात्र पाश्चिमात्य शौचालय जराही खराब झालेलं असेल तर तुम्ही ते वापरु शकत नाही.