भारतीय महिलांची हाडं ठिसूळ करतोय 'हा' आजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 01:29 PM2018-11-29T13:29:48+5:302018-11-29T13:32:33+5:30
सतत उन्हामध्ये जाणं टाळणं, कॅल्शिअमयुक्त आहाराची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे भारतीय महिलांमध्ये हाडं ठिसूळ करणाऱ्या एका आजाराचा धोका वाढत आहे.
सतत उन्हामध्ये जाणं टाळणं, कॅल्शिअमयुक्त आहाराची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे भारतीय महिलांमध्ये हाडं ठिसूळ करणाऱ्या एका आजाराचा धोका वाढत आहे. या आजाराचं नाव आहे 'ऑस्टियोपोरोसिस'. तरूण मुली, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि रजोनिवृत्त महिला यांच्यात कॅल्शिअमचे प्रमाण फार कमी असते. जे ऑस्टियोपोरोसिसचे मुख्य कारण आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये जवळपास 80 टक्के महिला म्हणजेच प्रत्येकी चार महिलांपैकी तीन महिला ऑस्टियोपोरोसिसने पीडित आहेत. तसेच 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला आणि रजोनिवृत्त झालेल्या महिलांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो.
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भारतातील महिलांमध्ये व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्याचबरोबर कमी प्रमाणात कॅल्शिअमचे सेवन, ऑस्टियोपोरोसिसबाबत जागरूकतेचा अभाव यांसारख्या कारणांमुळे ऑस्टियोपोरोसिस ही महिलांमधील एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक महिलांना तर आपल्याला होणारा त्रास हा ऑस्टियोपोरोसिसमुळे होणारा आहे हे देखील लक्षात येत नाही.
विटॅमिन 'डी' अत्यावश्यक पोषक तत्व
विटॅमिन 'डी' एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे, जे कॅल्शियमचे अवशोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. सूर्य प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे तत्त्व त्वचेत संश्लेषित होते. हे स्टेरॉयड हॉर्मोन आहे जे शरीरात काल्पनिक रुपात प्रत्येक कोशिकाला प्रभावित करते, आणि आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्याचे हेच महत्त्वाचे कारण आहे.
सावध करणाऱ्या गोष्टी :
- सध्या व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे.
- एनसीबीआय (NCBI) नुसार, जगभरातील लोकसंख्येपैकी 50 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी लढत आहे.
- प्रत्येक व्यक्तीला नियमितपणे कमीतकमी 10 ते 20 मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी ची गरज असते.
व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि ऑस्टियोपोरोसिस होण्याची कारणं :
- आधुनिक जीवनशैली
- शारीरिक हालचाली न करणं
- व्यसनांच्या आहारी जाणं
- अधिकाधिक कॅलरी आणि जंक फूडचं अधिक सेवन
- भेसळयुक्त आहार आणि कमी वयात होणारा मधुमेह
बचाव करण्यासाठी उपाय :
- शरीरातील हाडांना मजबूत करण्यासाठी योग्य तो आहार घेणं फायदेशीर ठरतं.
- निरोगी आहार आणि व्यायाम यांमुळे ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करणं शक्य होतं.
- व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी 40 मिनिटांपर्यंत उन्हाच्या संपर्कात राहणं गरजेचं असतं.
- सुर्यकिरणांमुळे शरीराला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळतं.
या गोष्टी लक्षात ठेवा :
निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिनयुक्त आहार घेणं फायदेशीर ठरतं. हे आरोग्य चांगलं राखण्यासाठी उपयुक्त ठरतं. जेवणात व्हिटॅमिन डीयुक्त आहाराचा समावेश करा. तसेच शक्य असेल तेवढं उन्हाच्या संपर्कात रहा त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
म्हणून ठिसूळ होतात हाडं :
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या या आजारामुळे हाडं फार कमजोर होतात. जरासं काही लागलं किंवा पडल्यामुळे, इतकचं नाही तर शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळेही फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.
सांधेदुखी किंवा फ्रँक्चर झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेल्या 100 वृद्ध व्यक्तींमध्ये जवळपास 30 टक्के लोक ही ऑस्टियोपोरोसिसने पीडित असतात. 35 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये बोन मिनरल डेंसिटी फार कमी असते त्यामुळे या व्यक्तींना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो.