InspectIR COVID-19 Breathalyzer : 'या' डिव्हाइसमुळे आता अवघ्या 3 मिनिटांत श्वासाद्वारे होणार कोरोना चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:44 PM2022-04-15T14:44:42+5:302022-04-15T14:45:26+5:30
InspectIR COVID-19 Breathalyzer : हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसून येत आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) श्वासोच्छवासाद्वारे कोरोना ओळखू शकणार्या डिव्हाइसच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते.
माहितीनुसार, या डिव्हाइसचे नाव इन्स्पेक्टआयआर कोविड-19 ब्रिथलायझर (InspectIR COVID-19 Breathalyzer) आहे. हे डिव्हाइस क्लिनिक, रुग्णालये आणि कोविड चाचणी केंद्रांवर वापरले जाऊ शकते. तसेच, या चाचणीचा अहवाल तीन मिनिटांत येतो. हे केवळ परवानाधारक आरोग्य सेवा प्रदात्याच्या देखरेखीखाली वापरले जाऊ शकते.
एफडीएच्या 'सेंटर फॉर डिव्हायसेस अँड रेडिओलॉजिकल हेल्थ'चे संचालक डॉ. जेफ शुरेन यांनी कोविड-19 साठी क्लिनिकल चाचण्यांमधील नावीन्यपूर्ण उदाहरण म्हणून याचे वर्णन केले. ते म्हणाले, यामुळे कोरोना व्हायरसची चाचणी मोठ्या प्रमाणात सुलभ होऊ शकते. कोविड-19 च्या बाबतीत, हे एक मोठे यश म्हणून उदयास येईल.
99.3 टक्के अचूक परिणाम
इन्स्पेक्टआयआर कोविड-19 ब्रिथलायझर हे डिव्हाइस कोरोना व्हायरसची लागण झालेले नमुने ओळखून 91.2 टक्के आणि नकारात्मक नमुने ओळखून 99.3 टक्के अचूक परिणाम देते, असे एफडीएने गुरुवारी सांगितले. तसेच, याद्वारे दररोज 160 नमुने तपासले जाऊ शकतात. हे नंतर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दरमहा 64,000 नमुन्यांची चाचणी करणे शक्य होईल, असेही एफडीएने म्हटले आहे.