सावधान! तासन्तास रील्स पाहण्याच्या नादात वाढतोय अंधत्वाचा धोका, डॉक्टरांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:49 IST2025-04-02T13:49:01+5:302025-04-02T13:49:36+5:30
इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले रील्स पाहिल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः मुलं आणि तरुणांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.

सावधान! तासन्तास रील्स पाहण्याच्या नादात वाढतोय अंधत्वाचा धोका, डॉक्टरांचा गंभीर इशारा
आजकाल सर्व वयोगटातील लोकांना रील्स पाहण्याचं व्यसन लागलं आहे. मात्र डॉक्टरांनी आता या व्यसनाबद्दल गंभीर इशारा दिला आहे. यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकतं असं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले रील्स पाहिल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः मुलं आणि तरुणांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.
यशोभूमी-इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर येथे आशिया पॅसिफिक अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या बैठकीत डोळ्यांच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली. एशिया पॅसिफिक अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी २०२५ अध्यक्ष डॉ. ललित वर्मा यांनी जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे होणाऱ्या 'डिजिटल आय स्ट्रेन'च्या साथीविरोधात गंभीर इशारा दिला. ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया, डोळ्यांवर ताण येण्याच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. विशेषतः जे तासनतास रील पाहत आहेत, त्यांना हा त्रास होत असल्याचं म्हटलं.
२०-२०-२० नियम पाळण्याचा सल्ला
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच एक विद्यार्थी आमच्याकडे आला आणि त्याने डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत असल्याची आणि दृष्टी अंधुक होत असल्याची तक्रार केली. तपासणीनंतर, आम्हाला आढळलं की घरी बराच वेळ स्क्रीनवर रील पाहिल्यामुळे त्याचे डोळे पुरेसे ओलावा निर्माण करू शकत नव्हते. त्याला ताबडतोब आयड्रॉप देण्यात आले आणि २०-२०-२० नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला. म्हणजे दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घेऊन २० फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहणं.
ड्राय-आय सिंड्रोमचा धोका
समितीचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हरवंश लाल म्हणाले की, ही समस्या खूप गंभीर आहे. त्यांनी सांगितलं की छोटे आणि आकर्षक रील्स दीर्घकाळ लक्ष वेधून घेण्यासाठी आणि नजर खिळवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सतत स्क्रीनवर लक्ष केंद्रित केल्याने डोळे मिचकावण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे ड्राय-आय सिंड्रोम होतो.
मायग्रेन आणि झोपेच्या समस्यांचा सामना
तज्ज्ञांनी इशारा दिला की, जर ही सवय थांबवली नाही तर त्यामुळे अंधत्व येऊ शकतं. डोळ्यांवर कायमचा ताण देखील येऊ शकतो. जी मुले दररोज तासन्तास टीव्ही पाहण्यात घालवतात त्यांना लवकर मायोपिया होण्याचा धोका असतो आणि त्याचे रुग्ण पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत. फोन आणि इतर डिजिटल उपकरणांच्या ब्लू लाईटमुळे तरुणांना अनेकदा मायग्रेन आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.