हृदय रोगांना दूर ठेवायचंय? आहारात काळ्या मिठाचा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:26 AM2018-09-24T10:26:07+5:302018-09-24T10:26:15+5:30
अभ्यासातून आढळून आले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये मिठाचं सेवन प्रतिदिवस ९.५ ग्रॅम आणि आंध्र प्रदेशात प्रतिदिवस १०.४ ग्रॅम होतं.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया म्हणजेच PHFI यांच्यातर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासातून खुलासा झाला आहे की, भारतातील वयोवृद्धांमध्ये WHO ने ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय आहे. अभ्यासातून आढळून आले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये मिठाचं सेवन प्रतिदिवस ९.५ ग्रॅम आणि आंध्र प्रदेशात प्रतिदिवस १०.४ ग्रॅम होतं. WHO ची सूचना आहे की, वयस्कांनी एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करु नये.
जास्त मीठ खाल्याने होतो हृदय रोग
डॉक्टरांनुसार, आहारात मीठ जास्त असल्याने रक्तदाबावर हानिकारक प्रभाव पडतो आणि याने कालांतराने हृदय रोगांचा सामना करावा लागू शकतो. आहारातून मीठ कमी केल्यास हृदय रोग होण्याची शक्यता २५ टक्क्यांनी कमी होते. तर हृदय रोगांमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यताही २० टक्क्यांनी कमी होऊ शकते.
जास्त मीठ खाल्याने संक्रमण होण्याचा धोका
भारतीय आहारामध्ये सोडियमचं अधिक प्रमाण असतं आणि यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकतं. जास्त मिठाचं सेवन केल्याने कालांतराने किडनीला नुकसान होतं. जास्त मीठ खाल्याने रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे नसा कठोर होतात आणि यामुळे रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाह कमी होतो. याने चेहऱ्यात ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि त्वचेवर सुरकुत्या येतात.
काळं मीठ अधिक फायदेशीर
हृदय रोगांपासून बचाव करायचा असेल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर शक्य तिथे काळ्या मिठाचा(सेंधे मीठ) वापर करावा. आयुर्वेदानुसार, काळ्या मिठाचा डाएटमध्ये समावेश केल्यास शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. याने कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, डिप्रेशन आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. कारण यात ८० प्रकारचे खनिज असतात.
प्रोसेस्ड फूडपासून रहा दूर
आपल्या आहारात मिठाच्या स्त्रोतांचा हिशोब लावा. पदार्थांची खरेदी करताना लेबलवरील माहिती वाचा. खासकरुन प्रोसेस्ड आणि डबाबंद फूड कमी खावं. कारण यात अधिक प्रमाणात मीठ असतं.
लोणचं, पापड, चटणी आणि सॉसमध्ये अधिक मीठ
भारतीय आहारामध्ये पारंपारिक रुपाने उपयोग होत असलेल्या लोणचं, पापड, चटणी यांमध्ये अधिक मीठ असतं. बऱ्याच सॉसमध्येही अधिक मीठ असतं. तीन महिने कमी मिठाचे पदार्थ खाल्यास तुम्हाला याची सवय होईल आणि याने तुमचं आरोग्यची चांगलं राहिल.
काळ्या मिठाचे फायदे
- अंगदुखी कमी करण्यासाठी काळ्या मीठाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरतं.
- कळ्या मीठामध्ये असलेली पोषक तत्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
- काळ्या मीठामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तसेच शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते.
- केसांचे आरोग्य राखण्यासाठीही काळं मीठ गुणकारी ठरते. काळ्या मीठामुळे केसांतील कोंडा, केसगळती तसेच केस दुभंगणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
- शरिरातील आयर्नचे प्रमाण वाढवण्याचे काम काळं मीठ करते.
- काळ्या मीठामध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे काळ्या मीठाच्या सेवनानं स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
- पोटाच्या विकारांवरही काळं मीठ गुणकारी ठरतं. यामधील पोषक तत्वे पोटात होणाऱ्या अॅसिडवर कंट्रोल करतात.
- पांढरं मीठ वजन वाढवण्याचं काम करतं तर काळं मीठ वजन कमी करण्यास मदत करतं.