International Tea Day: जाणून घ्या, चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 10:08 AM2019-12-15T10:08:14+5:302019-12-15T10:17:48+5:30
काहींना चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही, असे म्हणतात.
आजचा दिवस चहा प्रेमींसाठी खास आहे. कारण, आजचा दिवस म्हणजेच 15 डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन जगभरात साजरा केला जातो. भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. खरंतर, अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहानेच होते. काहींना तर चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही, असे म्हणतात. यानिमित्ताने चहाचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.
चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. चहामुळे थकवा, आळस दूर निघून जातो, असे एका संशोधनातून समोर आल्याचे सांगण्यात येते. दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. दरम्यान, आरोग्यासाठी चहा फादेशीर असला तरी अति सेवन न करता रोज घ्यायला काही हरकत नसल्याचेही बऱ्याचदा संशोधनातून म्हटले जाते.
चहा पिणे जसे शरीरासाठी चांगले आहे. तसेच चहाचे इतर फायदेही आहेत. केस चमकदार व्हावेत यासाठी ग्रीन टीचा वापर केला जातो. त्यासाठी ग्रीन टीच्या तीन बॅग उकळत्या पाण्यात टाकून पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून त्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार होतात. केस गडद होण्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर केला जातो. याशिवाय, भाजल्यावर चहापावडर भिजवून फ्रीजमध्ये ठेवून त्याने शेक दिला जातो. त्याने लवकर फरक पडतो असेही म्हणतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.)