International Yoga Day 2019 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या नियम, नाही तर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 10:14 AM2019-06-19T10:14:16+5:302019-06-19T10:20:11+5:30
येत्या २१ जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जाणार आहे. जगभरातील लोकांना योगाभ्यासासोबत जोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.
(Image Credit : tetonyoga.com)
येत्या २१ जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जाणार आहे. जगभरातील लोकांना योगाभ्यासासोबत जोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये योगाभ्यास करणं एक गरजही आहे. पण उठलं आणि योगाभ्यासाला सुरूवात केली असं होत नसतं. योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. तसेच योगाभ्यास करताना श्वास घेणे आणि सोडणे ही गोष्टही महत्वाची आहे.
(Image Credit : 247medline.com)
त्यामुळे योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योगाभ्यास करताना कधीही जबरदस्तीने करू नये. योगाभ्यास जेवढ्या आरामात कराल, तेवढा तुम्हाला फायदा होईल. पण तरी सुद्धा काही लोक योगाभ्यास करताना चुका करतातच. जाणून घेऊ काय आहेत त्या चुका.
योग्य ताळमेळाची कमतरता
(Image Credit : groupon.com)
योगाभ्यास करताना आसनात ताळमेळ अनेकजण ठेवत नाहीत. आपल्या मनाने कधी कमी तर कधी जास्त वेळ आसन केलं जातं. इतकेच नाही तर काही लोक सतत काही दिवस योगाभ्यास करतात आणि काही दिवस करत नाहीत. असं केल्याने शरीरावर सकारात्मक प्रभावाऐवजी नकारात्मक प्रभाव पडू लागतो. त्यामुळे अंगदुखीसारखी समस्या होऊ होते.
आसनात जबरदस्ती
(Image Credit : Studio Spin)
योगाभ्यास करताना कधीही शरीरासोबत जबरदस्ती करू नये, कारण असं करून तुम्ही तुमच्या शरीराच्या मसल्स आणि नसांवर उगाच ताण देत असता, जे फारच घातक ठरू शकतं. योगाभ्यास करताना जेवढं शक्य असेल तेवढच वाका किंवा हाता-पायांना ताणा. जबरदस्तीने ताण देऊ नका. तसेच एकाच दिवशी वेगवेगळा योगाभ्यास करणं तुम्हाला महागात पडू शकतं. योगाभ्यास हळूहळू आणि रिलॅक्स होऊन करा.
श्वास घेण्याची पद्धत
(Image Credit : Aware Meditation)
योगाभ्यासात श्वास योग्यप्रकारे घेणे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करणे फार महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तसं न केल्यास शरीराला कोणताही फायदा मिळत नाही. जसे की, आसन करताना समोर वाकतेवेळी श्वास बाहेर आणि मागे होता श्वास आत घेतला पाहिजे. सोबतच श्वासावर लक्ष केंद्रीत करण ही सुद्धा एक कला आहे. जी हळूहळू तुम्हाला येते. योगादरम्यान ५ किंवा १० मिनिटे श्वासांवर फोकस करणे खूप आहे. हा कालावधी हळूहळू वाढवत जावा. जर तुम्ही लागोपाठ श्वास घेणार नाही तर तुमच्या मांसपेशींपर्यंत ऑक्सिजन पोहचणार नाही.
खाणं-पिणं आणि योगाभ्यासात अंतर
(Image Credit : IBC24)
जेवण आणि योगाभ्यास यात कमीत कमी ३ तासांचं अंतर असणं फार गरजेचं आहे. तसेच अनेकदा योगाभ्यास करताना लोक मधेच पाणी पितात, असं अजिबात करू नये. कमीत कमी १ तासानंतरच पाणी प्यावे. योगाभ्यास करण्याच्या एक तास आधी पाणी बंद करा.
योगा करणे हे आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये तुम्हाला दिलासा देणारं ठरू शकतं. पण योगाभ्यास करताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. अशात योगाभ्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनातच करावा. जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल.