अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:41 PM2018-01-19T19:41:18+5:302018-01-19T19:45:39+5:30
पेशंट आणि डॉक्टरांनाही संशोधकांचा सावधानतेचा इशारा
- मयूर पठाडे
रात्री झोप न लागणं, मध्यरात्री अधून मधून उठावं लागणं.. झोपेच्या या सर्वसाधारण तक्रारी वाटल्या आणि त्याकडे आपण कायम दुर्लक्षच करीत असलो, तरी त्यामुळे आपण आपलं सुखाचं आयुष्य स्वत:हून दु:खात लोटत असतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.
आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचं रुपांतर झोप न लागणे, झोपेच्या तक्रारींत होतं, हे सगळ्यांनाच माहीत असलं तरी या दोन्ही तक्रारी एकत्र आल्यावर त्याचा परिणाम फार मोठा असतो. हळूहळू तो वाढत जातो, ही गोष्ट मात्र अनेकांना माहीत नसते किंवां त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
आॅस्ट्रेलियातील काही संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात त्यांना लक्षात आलं, नुसती अनियमीत झोपदेखील तुमच्या अनेक विकारांना आमंत्रण देऊ शकते. संशोधकांचा सर्वात मोठा निष्कर्ष म्हणजे दीर्घ काळापर्यंत जर झोपेच्या तक्रारींनी तुम्ही त्रस्त असाल, तर तुमच्या मेंदूवर त्याचा विपरित परिणाम होतो आणि एक प्रकारच्या दुष्टचक्रात तुम्ही अडकता. मेंदूवर परिणाम म्हणून शरीरावर परिणाम होतो, तब्येतीच्या तक्रारींमुळे आजारपणांत वाढ होते. आजारपणांमुळे निद्रानाशाचा विकार जडतो आणि त्यामुळे पुन्हा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असं हे दुष्टचक्र आहे.
या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. कॅरोल लॅँग यांनी त्यामुळे डॉक्टरांनाही सल्ला दिला आहे, की जेव्हा झोपेच्या तक्रारीची समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतो, येईल त्यावेळी निद्रानाश आणि ‘आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपेना’ (झोपेत काही क्षणांसाठी अचानक श्वास चालू-बंद होणे) हे दोन्ही विकार पेशंटला झालेले आहेत का ते आधी तपासा. या दोन्ही तक्रारी जर रुग्णांत आढळल्या तर अशा रुग्णांची गांभिर्यानं तपासणी करा आणि त्याप्रमाणे त्यावर उपचार करा.
पण झोपेच्या समस्या असतील, तर आपणही त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही.