शास्त्रज्ञांनी काढली हृदयाची ‘३डी’ प्रिन्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:57 PM2019-04-17T12:57:47+5:302019-04-17T12:58:56+5:30

खेळणी, वाहनांचे सुटे भाग आदी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे.

Israeli scientists print 3d heart using human tissue | शास्त्रज्ञांनी काढली हृदयाची ‘३डी’ प्रिन्ट!

शास्त्रज्ञांनी काढली हृदयाची ‘३डी’ प्रिन्ट!

Next

खेळणी, वाहनांचे सुटे भाग आदी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे. मात्र इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्याच्याही पुढे मजल मारत, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी पेशी आणि रक्तवाहिन्या वापरून चक्क हृदयाची निर्मिती केली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे जगभरातील वैद्यकशास्त्राला नवी आयाम मिळणार आहे.

(Image Credit : The Japan Times)

 मानवी शरीरातील हृद्य, यकृत, डोळे असे अवयव निकामी झाले, तर ते अन्य शरीरातून प्रत्यारोपीत करण्याचे तंत्रज्ञान आता सहज उपलब्ध आहे. त्यासाठीच अवयवदानाबाबत जागृती करून त्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्नही केले जातात. कारण स्वतंत्रपणे हुबेहुब मानवी अवयव बनविणे सध्यातरी साध्य झालेले नाही. गर्भजलाच्या माध्यमातून असे अवयव कृत्रिमपणे विकसित करण्याचे प्रयोगही जगभरात होत आहेत. पण त्यातही अद्याप दूरवरचा पल्ला गाठणे शिल्लक आहे. अशा वेळी तेलअविवमध्ये झालेल्या या संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.


(Image Credit : USA Today)

हे संशोधन यशस्वी करणाऱ्या चमूचे प्रमुख ताल डवीर यांच्या म्हणण्यानुसार, आजवर ३डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेकांनी हृदयाच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. पण प्रत्यक्ष मानवी पेशी, रक्तवाहिन्या, कप्पे आदी असलेले हे हृदय पहिल्यांदाच बनविण्यात आले आहे.

(Image Credit : Business Insider South Africa)

असे असले, तरीही सशाच्या हृदयाच्या आकाराचे हे कृत्रिम हृदय अद्याप प्रत्यारोपणासाठी सक्षम झालेले नाही. कारण मानवी हृदयाप्रमाणे कप्प्यांची उघडझाप करून ते धडधडते ठेवण्याचे तंत्रज्ञान शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. पण संशोधनाचा हाच वेग कायम राहिल्यास येत्या वर्षभरात हे हृदय प्राण्यामध्ये प्रत्यारोपित करण्याचा प्रयोग करता येईल आणि पुढील दहा वर्षांत प्रत्यक्ष मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यास सक्षम हृदयाची निर्मिती करता येईल, असा विश्वास डवीर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुडघ्याच्या कृत्रिम वाट्या, दात, केस यांप्रमाणे हृद्यासारखा अवयवही लवकरच कृत्रिमरित्या तयार करून माणसाच्या शरीरात बसविण्यात आला, तर आर्श्चय वाटायला नको!

Web Title: Israeli scientists print 3d heart using human tissue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.