'घरातून मासिक पाळी व्यवस्थापन शिकविणे गरजेचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:38 AM2023-03-11T06:38:17+5:302023-03-11T06:39:07+5:30

मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली. 

It is necessary to teach menstrual cycle management from home awareness about periods | 'घरातून मासिक पाळी व्यवस्थापन शिकविणे गरजेचे'

'घरातून मासिक पाळी व्यवस्थापन शिकविणे गरजेचे'

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील शाळा-समुदायांमध्ये आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृतीपर उपक्रम राबवित असताना मासिक पाळीविषयी असलेली उदासीनता अधोरेखित होते. त्यामुळे मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली आहे. आजही मुंबईसारख्या मेट्रो शहरांत मासिक पाळीविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे मुली-महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांविषयी बोलले जात नाही, याची खंतही अगस्ती यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षांपासून शहर, उपनगरांतील विविध समुदाय आणि शाळांमध्ये अवनी अगस्ती फाउंडेशन २४ या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात. त्यात मासिक पाळीविषयी माहिती, त्या काळातील स्वच्छता, लैंगिक शिक्षण, रजोनिवृत्ती, सॅनिटरी पॅडचे वितरण यावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. यासाठी संस्थेचे स्वयंसेवक वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूसह विविध वस्ती-समुदायांना भेट देत, याविषयी जनजागृती करण्यात येते.या विषयांबाबत अगदी सामान्यांची मानसिकता केंद्रस्थानी ठेवून हा बदल घडविण्यावर भर देत असल्याचे अगस्ती यांनी अधोरेखित केले.

असे चालते काम
व्यवस्थापन प्रशिक्षण सत्रात मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करणे, पाळीच्या दरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना हाताळणे, त्या दिवसातील स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न योग्य पद्धतीने हाताळणे, अंधश्रद्धा दूर करणे व सल्ला या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते.  
प्रशिक्षणाच्या म्यान मुली-मातांना मार्गदर्शन करण्यावर भर राहतो. पण त्यासाठी सुविधा आवश्यक ठरतात. म्हणून प्रत्येक शाळा – वाडी-वस्त्यांमधील स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहे परिपूर्ण असण्यावरही कटाक्ष आहे.   

व्हॅनद्वारे करण्यात येते वैद्यकीय तपासणी
शहर उपनगरातील भाभा, कूपर रुग्णालयांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने संस्थेद्वारे मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून विविध परिसरांत वैद्यकीय तपासण्या - शिबिरे घेण्यात येतात. यावेळी मुली-महिलांच्या प्राथमिक आरोग्य तपासण्या, त्याचप्रमाणे कर्करोग, मौखिक आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात. 

या तपासण्यांदरम्यानही अनेकदा मुले-मुली, महिला पुढाकार घेताना कचरत असल्याचे दिसून आले. मात्र, संवाद-शंकांचे निरसन केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद समाधान देणारा असतो, अशी भावना अगस्ती यांनी व्यक्त केली.

Web Title: It is necessary to teach menstrual cycle management from home awareness about periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य