कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर करावा की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:36 PM2018-10-17T15:36:48+5:302018-10-17T15:37:59+5:30
अनेकदा बरेच दिवस घरामघ्ये बटाटे तसेच पडून राहिले तर काही दिवसांनी त्यांना कोंब फुटतात. असे कोंब फुटलेले बटाटे खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज पसरवण्यात येतात.
अनेकदा बरेच दिवस घरामघ्ये बटाटे तसेच पडून राहिले तर काही दिवसांनी त्यांना कोंब फुटतात. असे कोंब फुटलेले बटाटे खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज पसरवण्यात येतात. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की, कोंब फुटलेले बटाटे खाल्याने पचनासंबंधातील समस्या होऊ शकतात. अनेकदा स्वयंपाक करतानाही बटाट्यांना फुटलेले कोंब काढून त्यानंतर बटाटे जेवणामध्ये वापरले जातात. जाणून घेऊयात नक्की कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही...
कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. कोंब येणं म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचे संकेत असतात. अशातच अशा भाजीचं सेवन करणं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच 'स्टार्च'चे (starch) रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यामुळे बटाटा नरम होतो.
बटाट्यामध्ये होणारे हे बदल सोलानिन आणि अलफा-कॅकोनिन नावाच्या दोन अल्कलॉइडच्या निर्मितीमुळे होते. सोलानिन हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक समजले जाते. त्यामुळे थोडेसे हिरवे झालेले बटाटे खाणंही टाळावं. कारण हिरवे बटाटे खाल्याने फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. संशोधनानुसार, ज्यावेळी भाजीला कोंब फुटतात त्यावेळी भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. परंतु, जर बरेच दिवस ठेवलेले बटाटे असतील आणि ते सुकून गेले असतील तर अशावेळी ते खाणं टाळावं.
बटाटे स्टोअर करण्याची योग्य पद्धत :
- बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे बटाट्यांमध्ये असलेल्या स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं.
- बटाट्यामध्ये 78 टक्के पाणी असतं. त्यामुळे साधारणतः 5 ते 7 महिन्यांपर्यंत टिकतात. परंतु त्यासाठी ते थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं.
- दमट वातावरणामध्ये किंवा हवा खेळती नसलेल्या ठिकाणी बटाटे ठेवल्याने बटाट्यांना कोंब फुटतात.
- बटाटे प्लास्टिक बॅगमध्ये न ठेवता ओपन व्हेजिटेबल बास्केटमध्ये ठेवणं फायदेशीर ठरतं.