हार्ट अटॅक कधी येणार हे 30 वर्षे आधीच कळणार, अमेरिकन डॉक्टरांच्या संशोधनामुळे अनेकांचे प्राण वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:18 AM2024-09-03T06:18:38+5:302024-09-03T06:18:55+5:30
Health News: एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे.
लंडन - एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे. अमेरिकन डॉक्टरांनी हे संशोधन केले असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ही एक प्रकारची रक्त चाचणी असून, यात तीन मार्कर तपासले जातात. हृदयरोगाचे डॉक्टर आतापर्यंत, चाचणीसाठी फक्त एका मार्करवर अवलंबून होते, त्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. एलडीएल कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींमध्ये जमा होते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कडक होतात. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
३० वर्षं चालले संशोधन
संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. पॉल रिडकर म्हणाले की, एलडीएल कोलेस्टेरॉल चाचणी एखाद्याचे हृदय किती निरोगी आहे हे तपासत नाही. तीन दशकांच्या संशोधनादरम्यान डॉक्टरांनी आणखी दोन शोध बायोमार्कर सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) आणि लिपोप्रोटीन्स जोडले. यात सीआरपी रक्तवाहिन्यांमधील सूज दिसते तर उच्च लिपोप्रोटीन पातळी भविष्यातील हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका दाखवते.
कुणाला धोका अधिक?
- संशोधनात ३०,००० अमेरिकन महिलांचा समावेश करण्यात आला होता.
- ज्या महिलांमध्ये उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त सीआरपी आणि लिपोप्रोटीनची पातळी जास्त होती त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त आढळून आला.
- नवीन चाचणी हृदयविकाराचा अंदाज लावण्यासाठी गेमचेंजर ठरू शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.