थंडीत कडक गरम पाण्याने अंघोळ करणे पडेल महागात, वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 01:48 PM2022-11-15T13:48:16+5:302022-11-15T13:49:48+5:30
थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते.
राज्यातील अनेक भागात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. ऋतुमानाप्रमाणे शरीरातही बदल व्हायला लागतात. त्वचा कोरडी पडते. थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते. त्वचा लाल होते, हातावर पुरळ येतात. या समस्या येऊ नयेत म्हणून अंघोळीच्या सवयी बदलण्याची गरज आहे. कमी तापमान असले की त्वचेवर लगेच परिणाम दिसतात त्यामुळे अंघोळ करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबतच्या सुचना त्वचेचे डॉक्टरही देतात.
एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, थंडीत कोमट पाण्यानेच अंघोळ करावी. खूप गरम पाणी शरीराला सहन होत नाही. थंडीत गरम पाणी कितीही बरे वाटत असले तरी ते त्वचेला हानिकारक आहे. कोमट पाणीच त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुरळित होते. कोमट पाण्याने शरीराचा स्वच्छता ही चांगली होते आणि दिवसभर प्रसन्न वाटते. फक्त पाणी जास्त गरम नाही ना याची काळजी घ्यावी.
थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी का ?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे नुकसानकारक नाही असे डॉक्टर सांगतात. मात्र ज्यांना थंड पाण्याची सवय आहे त्यांनीच थंड पाण्याने अंघोळ करावी. अनेकांना थंड पाणी सहन होत नाही. श्वास घ्यायलाही त्रास होतो अशा लोकांनी चुकुनही थंड पाणी घेऊ नये. शेवटी काय तर कोणाला नेमके काय सहन होते हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून असते.
जेवणानंतर लगेच अंघोळ करणे चुकीचे
खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच अंघोळ करु नये. यामुळे पचनसंस्थेत अडचण येते. जर नुकतेच जेवण केले असेल तर किमान दोन तासांनी अंघोळ करावी असा सल्ला डॉक्टर देतात. नाहीतर तुम्हाला जॉइंट पेन ची समस्या सुद्धा येऊ शकते.