आयव्ही थेरपी... नशेनंतरची नवी उपचार पद्धती; बदलत्या काळाची गरज की फॅशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:49 IST2024-12-31T07:48:36+5:302024-12-31T07:49:07+5:30
हँगओव्हरवर लिंबूपाण्याचे सेवन, ॲस्पिरिन घेणे किंवा निद्राधीन होणे हे उपाय आहेत. परंतु...

आयव्ही थेरपी... नशेनंतरची नवी उपचार पद्धती; बदलत्या काळाची गरज की फॅशन?
डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय -
मुंबई : पार्ट्या, लग्नसमारंभ, कॉर्पोरेट मेजवान्या यांमध्ये मद्यपान हे सामान्य झाले आहे. मात्र, मद्यपानानंतर होणारी अवस्था टाळण्यासाठी नवनवीन उपाय शोधले जात आहेत. त्यातलीच एक बहुचर्चित पद्धत म्हणजे आयव्ही थेरपी.
हँगओव्हरवर लिंबूपाण्याचे सेवन, ॲस्पिरिन घेणे किंवा निद्राधीन होणे हे उपाय आहेत. परंतु, आता महानगरांमध्ये हँगओव्हर क्लिनिक उदयाला येऊ लागले आहेत. हँगओव्हर झाला असेल, तर थेट या क्लिनिकमध्ये यायचे. तिथे तुम्हाला सलाइनद्वारे रक्तात पोषक द्रव्ये सोडली जातात. मुंबई, दिल्ली, बंगळुरू व हैदराबाद येथे ही क्लिनिक आहेत.
नव्या पिढीचा कल
२५ ते ४० वयोगटातील तरुण व्यावसायिक या सेवांकडे अधिक वळत आहेत. आमच्या पिढीला वेळेचे जास्त महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचे असते, महत्त्वाची मीटिंग असते. त्यामुळे लवकर रिकव्हर होणे गरजेचे असते, असे हे व्यावसायिक सांगतात.
सेवा आणि किंमत
या क्लिनिकमध्ये विविध ‘पॅकेजेस’ उपलब्ध असतात. बेसिक ड्रिपपासून ते अत्याधुनिक व्हिटॅमिन थेरपीपर्यंत यात पर्याय आहेत. या थेरपींचे शुल्क सहा हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत असते. प्रत्येक ड्रिपमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटामिन्स, मॅग्नेशियम, झिंक आणि विविध औषधांचे मिश्रण असते.'
वैद्यकीय दृष्टिकोन
अनेक डॉक्टर या ट्रेंडबद्दल साशंक आहेत. ही फक्त श्रीमंतांसाठी असलेली फॅशन आहे. निरोगी व्यक्तीला याची गरज नाही, असेही काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या पद्धतीमुळे हृदयविकार व मूत्रपिंड समस्या असलेल्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नशा व सामाजिक बदल
नशेनंतरची नवी उपचार पद्धती हा ट्रेंड केवळ वैद्यकीय नाही, तर सामाजिक बदलाचेही निदर्शक आहे. आधुनिक जीवनशैलीत ताण तणाव वाढले त्या सोबत मद्यपान ही वाढले आहे. कॉर्पोरेट कल्चर, सोशल नेटवर्किंग, स्ट्रेस मॅनेजमेंट या सर्वांचा यात समावेश आहे.
वैद्यकीय व शास्त्रीय भूमिका
- हे क्लिनिक्स कोणत्या नियमांखाली चालतात? त्यांच्यावर देखरेख कोण करतो? या मागील वैद्यकीय व शास्त्रीय भूमिका काय, असे प्रश्न विचारले जात आहेत.
- अशा प्रकारच्या नवीन उपचार पद्धतीचा खरच किती उपयोग होतो, हा अजून तरी चर्चेचा विषय आहे. थोडक्यात, नवीन तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगती स्वागतार्ह आहे. पण त्याचा वापर विवेकाने करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.