रोज रात्री एक ग्लास दूध व गुळ खाण्याचे हे आहेत 5 मुख्य फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 01:37 PM2017-11-28T13:37:43+5:302017-11-28T20:59:29+5:30
अधिक प्रमाणात गोड पदार्थाचं सेवन केल्यास केवळ शारीरिक वजन वाढण्याचाच धोका नसतो तर अनेक आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळू शकते.
मुंबई - अधिक प्रमाणात गोड पदार्थाचं सेवन केल्यास केवळ शारीरिक वजन वाढण्याचाच धोका नसतो तर अनेक आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळतं. यामुळेच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ गोड पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात. मात्र, गुळ एक असा गोड पदार्थ आहे जो तुमच्या आरोग्यासाठी प्रचंड पोषक आहे. रोज रात्री दुधासोबत गुळाच्या एका छोट्या तुकड्याचं सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. गुळ व दुधातील सत्त्व शरीरास निरोगी राहण्यास मदत करतात. गुळामधील लोह आणि दुधातील कॅल्शिअममुळे स्नायू आणि सांध्यांचं दुखणे कमी होण्यास मदत होते. दुधामध्ये व्हिटॅमिन 'अ', 'ब' व 'ड' व्यतिरिक्त कॅल्शिअम, प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिडदेखील असते. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असते.
रोज एक ग्लास दूध आणि गुळ खाण्याचे हे आहेत पाच फायदे
1. पचन प्रक्रिया सुधारण्यास होते मदत
गुळामध्ये पचन प्रक्रियेसंदर्भातील आजार सुधारण्यास मदत होते. गुळामुळे पचन प्रक्रिया सुलभरित्या होते व पोटामध्ये गॅस निर्माण होत नाहीत. विशेषकरुन हिवाळ्याच्या दिवसांत होणा-या पोटाच्या समस्या गुळ व दुधानं कमी होतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधासोबत एक तुकडा गुळाचे सेवन नक्की करा.
2. दम्यापासून मिळते सुटका
थंडीमध्ये दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. गुळ व काळ्या तिळांचा लाडू बनवून तो दुधासोबतही तुम्ही खाऊ शकता.
3. सांध्यांचे दुखणे होते कमी
दूध व गुळाच्या सेवनामुळे सांध्यांचे दुखणेदेखील कमी होण्यास मदत होते. कारण दुधात व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम आणि गुळातील लोहामुळे सांधे मजबूत होतात. तुम्ही गुळाचा तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता. यामुळे देखील शरीरास आरोग्यास फायदा मिळेल.
4. रक्तशुद्धीकरण
गुळ शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. शिवाय, हिमोग्लोबीनचेही प्रमाण वाढण्यास मदत होते आणि रोग प्रतिकारकशक्तीदेखील वाढते. यामुळे मासिक पाळीच्या वेळेस दुधासोबत गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
5. वजन घटवण्यास होते मदत
गुळ मधाप्रमाणेच आरोग्यास फायदेशीर असा आहे. कारण गुळ रासायनिक प्रक्रियांविना तयार केला जातो. यामुळे गुळ साखरेहून अधिक शरीरास पोषक आहे. यामुळेच रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत गुळाचे सेवन करावे.
आणखी वाचा: तांब्याची भांडी वापरणं आरोग्यासाठी उत्तम