जंक फूड खाताय? मग हे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 11:31 AM2018-07-03T11:31:52+5:302018-07-03T11:32:17+5:30
जंक फूडची व्याख्या करायची झालीच तर भरपूर तेल, मीठ, साखर आणि कॅलरिज असलेले पदार्थ म्हणजे जंक फूड असे म्हणता येईल.
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याचे दुष्परिणामही फार त्रासदायक असतात. सध्या पावसानेही चांगलाच वेग धरला असून आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आपला आहार संतुलित असणे गरजेचे आहे. परंतु आपण नेमके याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. रोजच्या धावपळीत वेळ वाचवण्यासाठी आपण झटपट बनणाऱ्या जंक फूडचा आधार घेतो. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रींक्स यांसारख्या जंक फूडचा शरिरावर विपरित परिणाम होत असतो. जंक फूडच्या अतिसेवनाने अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. जंक फूडची व्याख्या करायची झालीच तर भरपूर तेल, मीठ, साखर आणि कॅलरिज असलेले पदार्थ म्हणजे जंक फूड असे म्हणता येईल.
जंक फूडमुळे लाखो लोकांच्या आरोग्याची हेळसांड होत असते. जंक फूड बनवताना वापरण्यात येणाऱ्या तेल, मीठ आणि साखर यांच्या अतिवापराचा परिणाम सरळ लीव्हर आणि स्वादुपिंडांवर होत असतो. यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी यांच्यात वाढ होण्यास सुरुवात होते. या सर्व गोष्टींचा परिणाम लहानग्यांपासून थोरामोठ्यांच्या आरोग्यावरही होत असतो. यामुळे 15-16 वर्षे वयाच्या मुलांमध्येही लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार दिसून येतात. तसचे वयाच्या चाळीशीपर्यंत हे ह्रदयविकारांनाही बळी पडतात.
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे वेट लॉस सर्जन डॉ. आशीष भनोत यांनी सांगितले की, 'लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी त्यांच्या शरीरातील कॅलरिजवर कंट्रोल करणे गरजेचे आहे. जंक फूडच्या अतिसेवनामुळे त्यांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात कॅलरिजचे प्रमाण वाढते. बदलते राहणीमान आणि व्यायामाच्या कमतरतेमुळे मुलांची शारीरिक हालचालही होत नसून त्या कॅलरी बर्न होत नाहीत. आणि त्या फॅटच्या स्वरूपात शरीरात जमा होत राहतात. त्यामुळे जेवढे शक्य असले तेवढे लहान मुलांना जंक फूडपासून लांब ठेवणे गरजेचे आहे.'
वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, फॅट्स आणि कार्बोहाइड्रेटयुक्त जंक फूडचे पदार्थ आपल्या ब्रेनच्या रिवॉर्ड सिस्टमवर प्रभाव टाकतात. त्यामुळे आपण कितीही ठरवले तरिही जंक फूडपासून लांब राहूच शकत नाही. फॅट आणि कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थ आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचवणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांमार्फत रिवॉर्ड सिस्टमला अॅक्टिव्ह करतात. जेव्हा पदार्थांच्या सेवनातून फॅट आणि कार्बोहाइड्रेट एकत्र शरिरात जातात त्यावेळी रिवॉर्ड सिस्टमवर होणारा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर असतो.
ट्रान्सफॅट्स आणि केमिकलयुक्त फ्रेंच फ्राइज म्हणजे जंक फूडमधील सर्वांचा आवडता पदार्थ. परंतु डॉक्टरांकडून सांगण्यात येते की, भरपूर प्रमाणात फ्रेंच फ्राइज खाल्याने हायपरटेन्शन, मधुमेह आणि ह्रदयाशी निगडीत आजार जडण्याचा धोका संभवतो. 100 ग्रॅम फ्रेंच फ्राइजमध्ये 312 कॅलरी आणि 15 ग्रॅम फॅट असतात. तसेच बच्चेकंपनीचा आवडत्या बर्गरचे नियमित सेवन केल्यामुळे शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि ह्रदयाशी निगडीत आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. एका मध्यम आकाराच्या बर्गरमध्ये 540 कॅलरी असतात आणि 80 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. तसेच पिझ्झा, बर्गर यांच्याप्रमाणेच पिझ्झा रोजच्या रोज खाल्याने शरिरात फॅटचे प्रमाण वाढत असून लठ्ठपणासोबतच शरिरातील गुड कोलेस्टेरॉलची मात्राही घटते. त्यामुळे रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेसचे प्रामाण वाढत जाऊन स्ट्रोकचा धोका वाढतो. पिझ्झाच्या एका मोठ्या स्लाइसमध्ये 311 कॅलरी आणि 19 ग्रॅम फॅट असतात.