वार्धक्याच्या खुणा मिटवण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:03 PM2017-09-08T17:03:30+5:302017-09-08T17:08:06+5:30
वास्तवातल्या वयापेक्षा तुम्ही नक्कीच दिसाल तरुण..
- मयूर पठाडे
म्हतारं व्हायला, म्हातारपणाची लक्षण चेहºयावर, शरीरावर दिसायला लागली की सारेच जण अस्वस्थ होतात. ही लक्षणंं लपवण्यासाठी मग तयांची धडपड सुरू होते. काही जण हे वार्धक्य लपवण्यात यशस्वी होतातही, पण ते वार्धक्य फक्त पडद्याआड आपण लपवलेलं असतं, त्याचं खरं स्वरुप फक्त आपल्यालाच माहीत असतं.
वार्धक्य लपवण्याचा हा आटोकाट प्रयत्न वयाच्या एका टप्प्यानंतर किंवा खूप उशिरा सुरू होतो. वार्धक्य प्रत्येकाला अटळ आहे, हे निश्चित, पण ते आपण दूर निश्चितच ढकलू शकतो. आपण ज्या वयाचे आहोत, त्यापेक्षा तरुण खात्रीनं दिसू शकतो. त्यासाठी काही गोष्टी मात्र कराव्या लागतील.
वार्धक्याला पळवण्यासाठी काय कराल?
१- कुठल्या ना कुठल्या कारणानं बाह्य गोष्टींशी आपला संपर्क येत असतो. कधी हा संपर्क हवेमुळे असेल, कधी पाण्यामुळे, तर कधी अन्नामुळे. पण त्यात असलेले दुषित घटक आपल्या आरोग्याची आणि त्यातही आपल्या त्वचेची वाट लावत असतात. त्यापासून आपण वाचायला हवं आणि दुषित घटकांपासून आपल्याला जितकं लांब राहाता येईल तितकं लांब राहायला हवं.
२- आपलं शरीर रोज स्वच्छ करताना, त्यावरील दुषित घटकही निघून गेले की नाहीत, याची खात्री करायला हवी. त्यासाठी रासायनिक घटक असलेल्या पदार्थांचा वापर मात्र शरीरावर अजिबात नको. थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्यानं आपली त्वचा स्वच्छ केल्यास अनेक दुषित घटक आपल्या त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.
३- आपल्या शरीरात हेल्दी फॅट्स जाताहेत की नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. हे फॅट्स आपल्या त्वचेचीही काळजी घेईल. फॅटी अॅसिड, मांसाहार करणाºयांनी मासे, आॅलिव्ह आॅइल.. यासारखे पदार्थ आपल्या शरीरात जाताहेत की नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
४- आपल्याला असलेल्या रोजच्या टेन्शन्समुळे आपल्या मनावरच फक्त त्याचा विपरित परिणाम होतो, असं नाही. आपली त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगण्याकडे लक्ष द्या. योगा, ध्यानधारणा, हास्यविनोद, मित्रमंडळीत मन रमवणं या गोष्टी केल्या, तर आपलाच नाही, आपल्या त्वचेचाही उत्साह वाढेल.
५- त्वचा निरोगी राहाण्यासाठी योग्य आणि पुरेशी झोपही अत्यावश्यक आहे. रात्रीची झोप केव्हाही चांगली. झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी मुद्दाम दुपारी झोपण्यापेक्षा शक्यतो रात्रीच पुरेशी झोप घ्यावी.
६- व्यायाम हा प्रत्येकाच्या आरोग्याचा मूलमंत्र आहे. व्यायामामुळे केवळ तुमच्या मनाची, शरीराचीच नव्हे, तुमच्या त्वचेचीही शक्ती नक्कीच वाढेल.