जास्त काळ तरुण राहायचंय? वार्धक्याच्या खुणा पुसायच्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:31 PM2017-08-01T15:31:55+5:302017-08-01T15:42:48+5:30
हा उपाय करून पाहा.. तुमची आजारपणंही पळतील दूर..
- मयूर पठाडे
तुम्ही कुणीही म्हणाल, अक्रोड ही काय आमच्या आवाक्यातली गोष्ट आहे का? साधे शेंगदाणे आणायचे तर आम्हाला चार वेळा विचार करावा लागतो आणि तुम्ही अक्रोडची गोष्ट करताय.
तुम्ही म्हणताय, ते बरोबरच आहे. सर्वसामान्य माणसाला रोज अक्रोड खाणं शक्य नाही. अक्रोडसारख्या ड्राय फु्रटसचा आपण फक्त स्वप्नातच विचार करायचा..
पण हे अक्रोड काही आपल्याला रोजच्या रोज आणि मुठीच्या मुठी भरून खायचे नाहीत.
अक्रोडचा आपल्या शरीराला काय फायदा होतो यासंदर्भात नुकतंच एक संशोधन झालं आणि त्यातून खूप आश्चर्यकारक गोष्टी लक्षात आल्या.
अक्रोड आपल्या प्रकृतीसाठी तर उत्तम आहेच, पण अनेक आजारांवरही रामबाण उपाय म्हणून ते काम करतात.
अक्रोडमध्ये असं आहे तरी काय?
१- अक्रोडमधली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपली पचनशक्ती सुधरवतात. हो, पण जास्त खाल्ले तर बिघडवतातही
२- आपल्या शरीरात दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. चांगले आणि वाईट. अक्रोडमुळे शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि त्यामुळे आरोग्याला मदत होते.
३- या अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे दृदयविकार, कॅन्सर आणि डिमेन्शिया या अत्यंत घातक अशा आजारांपासून ते आपल्याला दूर ठेवतात. या आजारांची शक्यता अक्रोडमुळे खूपच लांब पळते.
४- एवढंच नाही, याशिवाय आपलं तारुण्य टिकवणं, वार्धक्याला आपल्यापासून चार हात दूरच ठेवणं, संधिवाताला आटोक्यात ठेवणं, मेंदू तल्लख ठेवणं.. यासारखे अनेक फायदे अक्रोडमुळे होतात.
५- अक्रोडमुळे आपल्या आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो. त्यांच्यात बदल होतो आणि विविध आजारांना रोखण्यासाठी त्याची मदत होते.
६- शास्त्रज्ञांनी अगोदर उंदरांवर हा प्रयोग केला आणि त्यांच्या लक्षात आलं, अक्रोडमुळे उंदीर चांगलेच हेल्दी झाले आहेत.
७- माणसांसाठीही अक्रोड तितकेच फायदेशी आहेत असं अमेरिकेतील या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
..आणि आता, आपला पहिला प्रश्न.. अक्रोड आम्हाला परवडणार कसे?.. तेवढी आमची ऐपतच नाही. पण त्याचंही उत्तर शास्त्रज्ञांनी देऊन ठेवलंय. रोज रोज आणि खूप अक्रोड खाण्याची गरज नाही. दोन महिने जरी तुम्ही नियमितपणे अक्रोड खाल्ले तरी तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
किती खाल?
एक अक्रोड चालेल?..
मग तेवढाच खा.
त्यानंतर हाच प्रयोग पुन्हा काही महिन्यांनी करा. तुमची ऐपत असेल तर आपल्याला झेपतील एवढे अक्रोड रोज खाल्ले तरी चालतील..
करून तर पाहा..
डॉक्टरांवर आपण इतके पैसे खर्च करतो, थोडे पैसे यासाठीही खर्च करून पाहू..
काय?..