प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:07 PM2017-10-25T15:07:31+5:302017-10-25T15:08:38+5:30
आयुष्य आनंदानं उपभोगायचं असेल, तर ही किल्ली शोधायलाच हवी..
- मयूर पठाडे
रोजच्या कामाच्या धबडग्यात एनर्जी आणायची तरी कुठून?.. बरं हे काही एका वेळेचं नाही, रोजचाच झगडा आहे तो.. वेळ पुरत नाही.. कामाचा रगाडा तर रोजचाच. कितीही उरकलं तरी उरकत नाही..
रोजची टेन्शन्स तरी किती? त्याचा तुमच्या शरीर, मनावर परिणाम होतोच. त्याचा आता अतिरेक होत चालला आहे, असे अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यासाठी मनाला, स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय प्रत्येकानं शोधले पाहिजेत असा सल्लाही या अभ्यासकांनी दिला आहे.
अलीकडच्या काळात यासंदर्भात अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यातील अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका आणि आॅस्ट्रेलियातील अभ्यास सांगतो की माणसांचं हसणं दिवसेंदिवस कमी झालं आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचं आयुष्य भलेही वाढलं असेल, पण त्याचा दर्जा मात्र सातत्यानं खालावतोच आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रसन्न राहाण्याची कला शिकून घेणं. प्रसन्नतेची ही गुरुकिल्लीच तुमचं आयुष्य सुखी, समाधानी करील. नाहीतर ताणतणावांच्या घेºयात आयुष्याचा खरा उपभोग तुम्हाला घेताच येणार नाही.
त्यासाठी या अभ्यासकांनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट किंवा तुम्हाला दु:ख देणारी जरी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा, तुमच्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट अवघड आह, पण अशक्यही नाही.
तुम्ही कोणत्याही इझमचे असा, कोणत्याही प्रवृत्तीचे असा, दैववादी असा किंवा नसा.. तुमच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना भले कोणतंही नाव द्या.. जे काही घडतं ते निसर्गाच्या इच्छेनं होतं म्हणा, देवाच्या इच्छेनं होतं म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेनं होतं म्हणा किंवा आपणच या साºया गोष्टींना कारणीभूत आहोत असं म्हणा.. पण चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा.. प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याचकडे आहे, ती शोधा.. त्यातूनच तुमच्या जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.. असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. त्याकडे आपणही सकारात्मकतेनं पाहायलाच हवं.