सारांश: पुरुषांनाही मेनोपॉज येतो का?

By संतोष आंधळे | Published: March 12, 2023 08:07 AM2023-03-12T08:07:26+5:302023-03-12T08:08:44+5:30

अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्याच्या समस्यांबाबतच्या उपचारांमध्ये  फसवणूक होत असल्याच्या घटना घडतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

know about do men get menopause too | सारांश: पुरुषांनाही मेनोपॉज येतो का?

सारांश: पुरुषांनाही मेनोपॉज येतो का?

googlenewsNext

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी 

आपल्याकडे सर्वसाधारणपणे ४७ ते ५० वर्षांनंतर येणाऱ्या महिलांच्या मेनोपॉजबद्दल (रजोनिवृत्ती) बोलले जाते. त्यानंतर होणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा होते. मात्र या वयात पुरुषही अशा काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असतील का? याबाबत फारसे बोलले जात नाही. मात्र पुरुषांनाही मेनोपॉजसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. पुरुषांमध्ये ‘टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स’ची पातळी कमी झाल्यामुळे त्यांच्यातही  शारीरिक बदल होत असतात. त्याला वैद्यकीय भाषेत ‘अँड्रोपॉज’ असे म्हणतात. यानंतर त्यांनाही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र  मेनोपॉज आणि अँड्रोपॉजमध्ये फरक आहे. महिलांच्या मेनोपॉजनंतर त्यांची मासिक पाळी बंद होते. त्यामुळे अर्थात महिलांची प्रजनन प्रक्रिया थांबते.

वाढत्या वयानुसार शरीरामध्ये विविध बदल घडत असतात. त्यांमधील एक बदल म्हणजे हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होत असते. पुरुषांमध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’ म्हणजे हे पुरुषांच्या अंडकोषांमध्ये तयार होणारे हार्मोन. या हार्मोन्समुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते, त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्ये त्याचे योगदान असते. या हार्मोन्समुळे उत्साह टिकून राहतो, शारीरिक ऊर्जा वाढविण्यासाठी त्याचा वापर होत असतो.

५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’ची पातळी कमी होण्याची विविध करणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा, मानसिक आणि  भावनिक ताण, रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार, जुनाट आरोग्याच्या व्याधींचा समावेश आहे. तसेच यावर वैद्यकीय विश्वात उपचार उपलब्ध आहेत.

पुरुषांमध्येही आरोग्याच्या समस्या

खरे तर आपल्याकडे पुरुषांच्या अँड्रोपॉजजी चर्चा व्हायला हवी. महिलांमध्ये  मेनोपॉजनंतर आपलं बाईपण संपलं की काय? आपण सुंदर दिसू शकू का? असे काही प्रश्न त्यांना भेडसावत असतात. मातृत्वपण संपले. विविध शारीरिक व्याधी सुरू होतात. मूड स्विंगस, त्वचेवरील बदल जाणवायला लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागतात. काम करण्याची कार्यक्षमता कमी होते. केस विरळ होतात. छातीतील धडधड वाढणे,  चिडचिड होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पुरुषांमध्येही अँड्रोपॉजनंतर या समस्या जाणवतात. त्यांनाही आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र त्यावर चर्चा होत नाही. पुरुषत्वावर बोलण्यास फार कमी उत्सुकता दाखवली जाते. त्यांच्याही आरोग्याबाबत खुलेपणाने बोलले पाहिजे. प्रत्येक पुरुष आणि महिलांच्या आयुष्यात वाढत्या वयानुसार शारीरिक संबंध करण्याची इच्छा कमी होते. - डॉ. सुजाता केळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

३० टक्के व्यक्तींना अँड्रोपॉज

पन्नाशीनंतर साधारणत: ३० टक्के व्यक्तींना अँड्रोपॉजच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे एक महत्त्वाचा बदल म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. मात्र आहारात योग्य बदल करून ‘टेस्टोस्टेरॉन’ची पातळी वाढवली जाते. त्याचप्रमाणे ‘टेस्टोस्टेरॉन’ची पातळी वाढविण्यासाठी काही औषधे आणि इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ती योग्य डॉक्टरांकडून घेणे अपेक्षित आहेत. लैंगिक जीवनात ‘टेस्टोस्टेरॉन’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. ते कमी झाल्यामुळे कामवासना कमी होते.  या अशा व्यक्तींना काऊन्सेलिंगची गरज असते. माझ्याकडे असे अनेक रुग्ण येत असतात. अँड्रोपॉजनंतरही पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होते; तसेच प्रजननक्षमता देखील असते, मात्र प्रमाणात फरक पडतो.  - डॉ. प्रकाश कोठारी, सेक्सॉलॉजिस्ट

काय आहेत लक्षणे?

- निद्रानाश 
- त्वचेवर कोरडेपणा येणे 
- नैराश्य 
- एकाग्रता कमी होणे 
- काही व्यक्तींना सतत घाम येतो
- चिडचिड होणे शारीरिक संबंध ठेवण्यास उत्सुकता नसणे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: know about do men get menopause too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य