पीसीओएस आजार की सिंड्रोम? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या याची लक्षणे, कारणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:29 PM2022-03-13T17:29:09+5:302022-03-13T17:29:43+5:30

अनियमित मासिक पाळी हे पीसीओएसचे पहिले लक्षण आहे. वजन वाढणे, तेलकट त्वचा, केस गळणे देखील यांचा देखील इतर लक्षणांमध्ये समावेश आहे. हार्मोन्सचे असंतुलन जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून निदान केले जाते.

know causes symptoms remedies of PCOS from experts | पीसीओएस आजार की सिंड्रोम? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या याची लक्षणे, कारणे अन् उपाय

पीसीओएस आजार की सिंड्रोम? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या याची लक्षणे, कारणे अन् उपाय

Next

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा आजार नाही. हा एक सिंड्रोम आहे ज्यात स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन आणि अनियमित मासिक पाळी सारख्या समस्या दिसून येतात. हा सामान्यतः १७-३६ वर्षे प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतो. मासिक पाळी बहुतांश तरुण मुलींमध्ये अनियमित असल्याचे दिसून येते. अनियमित मासिक पाळी हे पीसीओएसचे पहिले लक्षण आहे. वजन वाढणे, तेलकट त्वचा, केस गळणे देखील यांचा देखील इतर लक्षणांमध्ये समावेश आहे. हार्मोन्सचे असंतुलन जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून निदान केले जाते.

यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीसीओएसचा अर्थ अनेकदा चुकीचा काढला जातो. पीसीओएस म्हणजेच 'सिस्ट' असे नाही. सोनोग्राफीमध्ये तुम्हीला जे दिसून येते ते अंडाशयातील अतिरिक्त फॉलिकल्स आहेत जे योग्य वेळी वाढू शकत नाहीत आणि ओव्हुलेशन करू शकत नाहीत ज्यामुळे अनियमित मासिक पाळी येते आणि परिणामी वंध्यत्वासारखी समस्या उद्भवते. फास्ट फूड, बैठी जीवनशैली यामुळे तरुणींमध्ये पीसीओसमुळे निर्माण होणारी वंध्यत्वाची समस्या वाढत आहे.

पीसीओसच्या व्यवस्थापनाचे मार्ग
वैद्यकीय भाषेत पीसीओएस हा एक सिंड्रोम म्हणून ओळखला जातो आणि हा काही रोग नाही. स्त्रिया निरोगी जीवनशैलीचे पालन करुन या समस्येपासून नक्कीच दूर राहू शकतात आणि यालाच व्यवस्थापनाची पहिली पायरी म्हटली जाते.

  • किशोरवयीन मुलींनी अचुक जीवशैलीचे पालन करणे फायदेशीर ठरते.
  • यासाठी प्रथिने समृध्द, कमी चरबीयुक्त आणि कमी साखरेचा आहार घेण्याची शिफारस केली जाते. नियमित व्यायाम करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
  • जंक फूडचे सेवन टाळणे, रोजचा व्यायाम करणे देखील फायदेशीर ठरु शकते. ५ टक्के वजन कमी होणे देखील मासिक पाळी पुनर्संचयित करण्यासाठी तसेच ओव्हुलेशनमध्येही मदत करते.

तथापि, सर्व महिलांचे वजन जास्त नसते. काहींना हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. ज्या महिलांची प्रजननक्षमता कमकुवत आहे आणि त्यासाठी ज्या संघर्ष करत आहेत त्यांच्या व्यवस्थापनाची दुसरी पायरी म्हणजे औषधांचे सेवन करणे. या औषधांमुळे फॉलिक्युलर वाढ होण्यास आणि ओव्हुलेशन सुधारण्यास मदत होते.

यातही ६० टक्के स्त्रिया ज्यांना वंध्यत्वाची समस्या नसते त्यांना सहज गर्भधारणा होऊ शकते. मात्र, या गोळ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्याव्यात आणि त्या परिणामकारक आहेत का हे सोनोग्राफीद्वारे तपासून पाहावे. काही स्त्रिया गोळ्यांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत आणि त्यांना संप्रेरक इंजेक्शन्सची आवश्यकता भासू शकते जे वैद्यकीय देखरेखीखाली सर्वात कमी डोसमध्ये दिले जाते.  ज्या महिला गोळ्या आणि इंजेक्शन्सना प्रतिसाद देत नाहीत त्यांना समस्या सुधारण्यासाठी लॅपरोस्कोपिक प्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ही प्रक्रिया तज्ञांच्या देखरेखेखाली केली गेली पाहिजे.

पीसीओएस सहसा वयानुसार सुधारतो. स्त्रीचे वय जसजसे वाढते तसतसे त्यांची अंडी कमी होतात आणि पीसीओएसची तीव्रता कमी होऊ शकते. तथापि, दीर्घकाळापर्यंत पीसीओएसचा उपचार केला पाहिजे. स्त्रीला वर्षभरात किमान ६-७ वेळा मासिक पाळी आली पाहिजे. मासिक पाळीची दीर्घकाळ अनुपस्थिती गर्भाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते आणि मासिक पाळीची सतत अनुपस्थिती एंडोमेट्रियल कर्करोगाची लागण होण्यासही कारणीभूत ठरते.

स्त्रीला गर्भधारणेची इच्छा नसली तरीही तुमच्या डॉक्टरांना भेटणे आणि मासिक पाळीचे नियमन करणे महत्त्वाचे आहे. पीसीओएस स्त्रियांना हायपोथायरॉईडीझम नावाचा थायरॉईड संप्रेरक विकार होण्याची शक्यता असते. यासाठी स्क्रीनिंग करणे आणि साध्या औषधोपचाराने त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. पीसीओएस आणि चूकीची जीवनशैली असलेल्या महिलांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते. हे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचे वैशिष्ट्य असलेल्या सतत इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे होते. निरोगी जीवनशैली हा आजार दूर ठेवण्यासाठी खूप मदत करते.

-डॉ. रिचा जगताप, वंधत्व निवारण तज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई

Web Title: know causes symptoms remedies of PCOS from experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.