प्रेग्नन्सीमध्ये मका खाणं योग्य आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:53 PM2019-12-18T16:53:26+5:302019-12-18T16:57:25+5:30
गर्भावस्थेत महिला जे काही खातात तर ते होणाऱ्या बाळासाठी तसंच आईसाठी दोघांसाठी पोषक असणं गरजेचं असतं.
गर्भावस्थेत महिला जे काही खातात तर ते होणाऱ्या बाळासाठी तसंच आईसाठी दोघांसाठी पोषक असणं गरजेचं असतं. म्हणूनच डॉक्टर अधिक लक्ष देत असतात. गरोदरपणात अनेक महिलांना मका खाण्याची इच्छा होत असते. तर आंबट सुध्दा खावसं वाटत असतं. पण मका खाण्याची इच्छा झाल्यास अनेक महिला खायचं टाळतात. कारण मका गरोदर असताना खाणं योग्य आहे की नाही या बाबात अनेक महिलांना शंका असते. पण आरोग्य तज्ञांच्या मतानुसार मक्याचे दाणे खाणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊया मका खाण्याचे परीणाम कशाप्रकारे आरोग्यावर होतात.
मका या पदार्थात अनेक पोषक तत्व असतात. तसंच फॉलिक अॅसिड, कार्बोहायड्रोट्स मोठ्या प्रमाणात असतात. मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. तसंच झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. त्यामुळे बाळाचे आरोग्य उत्तम राहते. मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्वचेवर जर खाज येत असेल तर त्या भागावर मक्याच्या स्टार्चचा वापर करता येतो. त्यामुळे त्वचा मऊ राहते.
गरोदर महिलांनी मका खाणं फायदेशीर ठरतं. कारण मक्यात फॉलिक अॅसिडस् असतात. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते. कारण फॉलिक अॅसिड कमी असल्यामुळे बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असते. तसंच आर्यनच्या कमतरतेमुळे अॅनिमीया हा आजार होऊ शकतो. मक्याचे सेवन केल्यास व्हिटामीन बी योग्य प्रमाणात मिळते. ज्यामुळे अॅनिमिया सारखे आजार उद्भवत नाही. त्यामुळे गरोदर महिलांनी आहारात मक्याचा समावेश करणं गरजेचं आहे.