झोपेसंबंधी ही चूक कराल तर हार्टस्ट्रोकचा वाढू शकतो धोका, वेळीच व्हा सावध.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 10:13 AM2019-12-16T10:13:16+5:302019-12-16T13:10:51+5:30
आरोग्य चांगलं राहण्यासाठी खाण्यापिण्यासोबतच व्यवस्थित झोप घेणं सुध्दा आवश्यक आहे.
आरोग्य चांगलं राहण्यासाठी खाण्यापिण्यासोबतच व्यवस्थित झोप घेणं सुध्दा आवश्यक आहे. झोप घेतल्याने थकवा निघण्यास मदत होते. तसंच वेगवेगळ्या आजारांपासून वाचता येतं. सध्याच्या काळात व्यस्त जीवनशैलीत लोकांना पुरेशी झोप घेणं शक्य होत नाही.
अलिकडेच मेडिकल जर्नल न्यूरोलॉजी या पुस्तकात प्रकाशित केलेल्या रिसर्चनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात असं नमुद करण्यात आलं आहे की गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यास शरीरासाठी जीवघेणं ठरू शकतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपत असाल तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण जास्त झोपल्यामुळे डार्ट स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
या रिसर्चनुसार नऊ तासापेक्षा जास्त झोपल्यास हार्टस्ट्रोकचा धोका २३ टक्क्यांनी वाढतो. जे लोक ९ तासापेक्षा जास्त झोपतात. त्यांना हार्टस्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. तुलनेने ७ तासापेक्षा कमीवेळ झोप घेणाऱ्या लोकांना हार्टस्ट्रोक संभवण्याची शक्याता कमी असते. तर जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्ये ८५ टक्के लोक हे सकाळी जास्त वेळ झोपतात.
रिसर्चकर्त्यांच्या म्हणण्यांनुसार जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वेगाने वाढत असते. अशा व्यक्तींचं वजनसुध्दा वाढतं. त्यामुळे हार्टस्ट्रोक होण्याचा धोका जास्त असतो. जास्त प्रमाणात घेतलेली झोप ही निष्क्रीय जीवनशैलीकडे जाणारी असते.
या रिसर्चसाठी सुमारे ३१ हजार सातशे ५० लोकांना सामिल करून घेण्यात आलं होतं. तसेच ज्याचं वय साठ वर्षापोक्षा जास्त होतं. असे लोक या रिचर्समध्ये सहभागी होते. सुरूवातीला जेव्हा रिसर्च सुरू झाला तेव्हा या लोकांना कोणतेही आजारपण नव्हते. तब्बल ६ वर्ष हा रिसर्च चालू होता. ६ वर्ष या रिसर्चमध्ये समावेश असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर तसंच झोपेच्या वेळांवर लक्ष ठेवण्यात आले होते. हा रिसर्च पूर्ण झाल्यानंतर सुमारे १ हजार पाचशे ५७ लोकांना हार्टस्ट्रोक असल्याचे निदर्शनास आले. या रिसर्चनुसार सात तासापेक्षा जास्त झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत सात तासापेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले होते. हार्टस्ट्रोक झालेल्या लोकांची संख्या २३ टक्क्यांनी जास्त होती.