कान केव्हा साफ करावेत? त्याची योग्य पद्धत कोणती? हे जाणून घ्याच, अन्यथा दुष्परिणाम नक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:20 PM2022-01-13T15:20:34+5:302022-01-13T15:23:10+5:30
काही लोक विनाकारण इअरबड (Earbud) किंवा अन्य कोणत्याही वस्तूनं सतत कान स्वच्छ करत असतात. सतत कान स्वच्छ करणं हे देखील घातक आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
कान (Ear) हे महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. आरोग्यासाठी कानाची स्वच्छता करणं आवश्यक आहे. कानात प्रमाणापेक्षा जास्त मळ (Wax) साचला तर त्यामुळे गंभीर समस्या उदभवू शकतात. प्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासते. मात्र, काही लोकांना प्रमाणपेक्षा जास्तवेळा कान स्वच्छ (Clean) करण्याची सवय असते. काही लोक विनाकारण इअरबड (Earbud) किंवा अन्य कोणत्याही वस्तूनं सतत कान स्वच्छ करत असतात. सतत कान स्वच्छ करणं हे देखील घातक आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
कानात मळ साठणं ही सामान्य गोष्ट आहे. या मळामुळे बाहेरील धूळ, मातीचे कण कानाच्या आतल्या भागात जाऊ शकत नाहीत. तसेच बॅक्टेरिया (Bacteria) वाढू शकत नाही. तसेच संसर्गाचा (Infection) धोका कमी होतो. एखाद्यावेळी अचानक कान दुखू लागतो, कमी ऐकू येऊ लागतं, अशावेळी कानातील मळ स्वच्छ करणं गरजेचं आहे, असं समजावं. परंतु, काही लोक विनाकारण, सातत्यानं कॉटनबड किंवा अन्य वस्तूच्या सहाय्यानं कान स्वच्छ करतात. मात्र सातत्यानं असं केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
कानात अधिक प्रमाणात मळ साचणं किंवा कानातील मळ कमी होणं या दोन्ही गोष्टी हानीकारक आहेत. कानातील मळ स्वच्छ न करणं किंवा कानातील मळ विनाकारण स्वच्छ केल्यानं संसर्गाचा धोका वाढतो. जर तुमच्या कानात कमी अवधीत अधिक मळ जमा होत असेल तर हा एखाद्या आजाराचा सूचक इशारा असू शकतो. अशा स्थितीत तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कान दुखू लागला, शिट्टीसारखा आवाज वारंवार येऊ लागला, ऐकू कमी येत असेल तेव्हाच कानातील मळ स्वच्छ करणं आवश्यक आहे. परंतु, अशावेळी स्वतःच कानाची स्वच्छता करण्याऐवजी तुम्ही कानाच्या समस्येबाबत आणि स्वच्छतेबाबत ईएनटी तज्ज्ञांचाही (ENT Expert) सल्ला घेऊ शकता.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कानातील मळ हा कानाचं रक्षण करतो. यामुळे बाहेरील धूळ, घाण किंवा बॅक्टेरिया थेट कानात जाऊ शकत नाही. मळ जास्त वेळा स्वच्छ केल्यास धूळ, घाण, बॅक्टेरिया कानात जावून संसर्ग होण्याची शक्यता असते. कानांच्या स्वच्छतेसाठी मनानं ईअरबड किंवा अन्य वस्तूंचा वापर करू नये. यामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची आणि ऐकू येण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.
सातत्यानं कान स्वच्छ करण्याच्या सवयीमुळं बऱ्याचदा मळ कानाच्या आतील बाजूला सरकतो. यामुळे समस्या दूर होण्याऐवजी वाढू शकते. वारंवार कॉटन बड किंवा अन्य वस्तूने कान स्वच्छ केल्यास संसर्गाचा धोका वाढतो. तसेच कानातील छिद्र ब्लॉक होण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांनी सांगितलं.