त्वचा रोगासह ताण-तणावाचं कारण ठरू शकतो सोरायसिस, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:28 PM2020-01-30T13:28:23+5:302020-01-30T13:35:49+5:30
ताणतणावाचा प्रचंड नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांगीण आरोग्यावर होत असतो.
ताणतणावाचा प्रचंड नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांगीण आरोग्यावर होत असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘सोरायसिस. सोरायसिसमध्ये रुग्णाच्या अंगावर सर्व ठिकाणी लाल ,जाड, खाजणारे ठिपके येतात. सोरायसिस आणि तणाव यांच्यात थेट संबंध असतो. सोरायसिस हा रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार आहे. तणावामुळे रोगप्रतिकारकतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. जर रुग्णांना हा ताण-तणाव आणि सोरायसिसदरम्यानचा संबंध वेळीच लक्षात आला, तर ते तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू शकतील आणि त्याद्वारे त्यांना सोरायसिसमुक्त होण्यास निश्चित मदत होईल.
या आजाराबद्दल माहिती ही त्वचाविज्ञान प्राध्यापक डॉ. किरण गोडसे यांनी दिली आहे. डॉ. किरण गोडसे अपोलो हॉस्पिटल व फोर्टिस हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या नेरूळ येथील डी वाय पाटील विद्यापीठातील प्राध्यापक आहेत. सोरायसिस शरीराच्या सांध्यांवरही परिणाम करू शकतो आणि यामुळे लोकांना चालता-फिरताना त्रास होतो तसेच काही प्रमाणात अपंगत्वदेखील येऊ शकते. सोरायसिसच्या रूग्णांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर परिस्थितींचा धोका जास्त असतो. ( हे पण वाचा-थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे सोडाल!)
सोरायसिस असलेल्या बर्याच लोकांना हे खाजणारे ठिपके कायमचे येत नाहीत. ते अधून-मधून येत राहतात. यासाठी तणाव हे एक सामान्य लक्षण आहे आणि अशा तणावाखाली असतानाच रुग्णांना अनेकदा सोरायसिसचा त्रास होतो. आयुष्यात एखादी भीषण घटना घडून गेल्याच्या वर्षभरातच अनेक रुग्णांना सोरायसिसचा त्रास उद्भवतो.
सोरायसिसमुळे येऊ शकतो ताण-तणाव
तणाव आणि सोरायसिसमधील दुवा एखाद्या दुष्टचक्रासारखा आहे. तणावामुळे सोरायसिस गंभीर होऊ शकतो. उपचारासाठी लागणारा खर्च, रोगाच्या वेदनांसह जगण्याचे ओझे, सततची अस्वस्थता,आणि रोगाचा कलंक या बाबी या आजाराशी संबंधित जोडलेल्या नकारात्मकतेमुळे एक पेच बनू शकतात आणि तणाव अधिकच वाढवू शकतात. दुर्दैवाने, तणाव सोरायसिसला अधिकाधिक दुर्धर बनवू शकतो.रुग्णांनी तणाव नियंत्रित ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत. ( हे पण वाचा-झटपट पोटाचा घेर कमी करायचाय? काकडीचा आणि पुदिन्याचा ज्यूस प्याल तर व्यायामाशिवाय बारीक व्हाल)
नियमित व्यायाम करा
व्यायामामुळे शरीरातील ‘एंडोर्फिन’ नावाच्या रसायनांची पातळी वाढण्यास मदत होते जे चिंता कमी करण्यास, व्यक्तीची मनःस्थिती सुधारण्यास आणि ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात, यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
व्यावसायिक मदत घ्या
रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप किंवा वैयक्तिक समुपदेशन सत्र तणाव कमी करण्यात आणि त्यांची चिंतेचे निवारण करण्यासाठी मदत करू शकतात.
विश्रांतीसाठी वेळ ठरवा
रुग्णांना विश्रांती घेण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. छंदात गुंतल्याने रुग्णांना तणाव कमी तसेच रिलॅक्स होण्यास मदत मिळू शकेल. तसेच उत्तम दर्जाचे मालिश केल्याने स्नायूंचा ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
रुग्ण सोरायसिसवर करत असलेल्या उपचारांचा प्रभाव न दिसल्यास तणावग्रस्त असतात, म्हणूनच रुग्णांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार औषधोपचार करणे अत्यावश्यक आहे. तथापि, लक्षणे सुधारत नसल्यास किंवा आणखी वाढत राहिल्यास, योग्य उपचार करण्यासाठी रूग्णांनी डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.