मैदा आरोग्यासाठी नुकसानकारक असण्याचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 10:37 AM2019-01-10T10:37:15+5:302019-01-10T10:40:06+5:30
हे तर सर्वांनाच माहीत असेल की, मैदा आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. तरी सुद्धा मैद्यापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ रोज चवीने खाल्ले जातात.
हे तर सर्वांनाच माहीत असेल की, मैदा आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. तरी सुद्धा मैद्यापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ रोज चवीने खाल्ले जातात. खरंतर बाजारात उपलब्ध असलेले तब्बल ८० टक्के बेकरी प्रॉडक्ट मैद्यापासून तयार केलेले असतात. चला जाणून घेऊया मैद्यापासून होणारे नुकसान...
मैदा आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून हानिकारक असतो. कारण मैद्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आतड्यांना चिकटतात आणि त्याकारणाने वेगवेगळे आजार होतात. खरंतर मैदा खाल्ल्याने लगेच शरीराचं नुकसान होत नाही. काही दिवस गेल्यावर याने शरीरावर होणारे हानिकारक प्रभाव बघायला मिळतात.
काय आहे कारण?
मैदा सुद्धा पीठाप्रमाणे गव्हापासून तयार होतो. तरी सुद्धा पीठ आरोग्यासाठी चांगलं आणि मैदा आरोग्यासाठी हानिकारक म्हटला जातो. कारण या दोन्ही गोष्टी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जेव्हा पीठ तयार केलं जातं तेव्हा गव्हाच्या दाण्यांचं कवच काढलं जात नाही. तसेच पीठ जरा जाडच दळलं जातं. असं केल्याने पीठामध्ये फायबरचं प्रमाण कायम राहतं आणि याने पीठातील फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी-६ आणि बी कॉम्प्लेक्स सारखे व्हिटॅमिन तसेच मॅग्नेशिअम, मॅग्नीज, झिंक यांसारखे मिनरल्सही कायम राहतात. हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेत. पण मैद्याचं असं नसतं. मैदा तयार करताना गव्हाच्या दाण्यांचं कवच पूर्णपणे काढलं जातं. सोबतच याचं पीठ फार बारीक दळलं जातं. त्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्त्वे नष्ट होतात. हे कोणत्या भुशापेक्षा कमी नसतं.
मैदा खाण्याचे नुकसान
मैदा जितका पांढरा आणि स्वच्छ असतो, तसा गव्हाच्या पीठाचा रंग नसतो. जास्त शुभ्र करण्यासाठी आणि चमक आणण्यासाठी गव्हाचं पीठावर हानिकारक केमिकल्सने ब्लीच केलं जातं. त्यानंतर मैदा तयार होतो. कॅल्शिअम परऑक्साइड, क्लोरीन, क्लोरीन डाय-ऑक्साइड इत्यादी ब्लीचिंग एजंटचा वापर मैद्याला ब्लीच करण्यासाठी केला जातो. याच केमिकल्सचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
फायबर नसतं
मैदा खूप मुलायम असतो, सोबतच यात डाएट्री फायबर अजिबात नसतं. त्यामुळे मैदा पचवणे सोपं नसतं. योग्यप्रकारे पचन न होत असल्या कारणाने याचा काही भाग हा आतड्यांना चिकटून राहतो आणि यानेच वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. सतत मैदा खाल्ल्याने नेहमी पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
मैद्याने वाढतं वजन
मैद्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असतं. त्यामुळे याचं सेवन केल्याने जाडपणा वाढतो. तसेच याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लडमध्ये ट्रायग्लीसराइड स्तरही वाढतो. त्यामुळे तुम्हाला वजन किंवा जाडेपणा कमी करायचा असेल तर आहारातून मैद्याला नेहमीसाठी आऊट करा. मैद्यामध्ये फार जास्त ग्लूटन आढळतं, ज्याने पदार्थ मुलायम होतात. याने फूड अॅलर्जीची समस्या होते. तसेच मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढते, कारण यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतात. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा की, मैद्याचे पदार्थ खायचे किंवा नाही.